साताळी मंदिर परिसरातील गुन्ह्याची सखोल चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:21+5:302021-06-26T04:18:21+5:30
शाहूवाडी तालुक्यातील साताळी मंदिर परिसरात झालेल्या मारहाण प्रकरणातून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात या घटनेशी काहीही संबंध नसणाऱ्या हारुगडेवाडी ...
शाहूवाडी तालुक्यातील साताळी मंदिर परिसरात झालेल्या मारहाण प्रकरणातून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात या घटनेशी काहीही संबंध नसणाऱ्या हारुगडेवाडी येथील काही व्यक्तींची विनाकारण नावे गोवण्यात आली असून या गुन्ह्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा कार्यकारी सदस्य रमेश चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुखांना दिलेल्या निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की, हारुगडेवाडी येथील बाबूराव शिवाजी सावंत यांचे भाचे नीलेश रघुनाथ पाटील (मूळ गाव मांगरुळ, ता. शिराळा) यांचा घरगुती वाद आहे. यातूनच शुक्रवार दि. ११ जून रोजी साताळी मंदिर परिसरात सावंत व त्यांचे भाचे पाटील यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर पाटील यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात सावंत यांच्यासह पंधराजणाविरुद्ध जबर मारहाण केल्याची फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून या सर्वांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या फिर्यादीमध्ये नीलेश पाटील यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून या प्रकरणाशी कोणताही संबंध नसणाऱ्या हारुगडेवाडी येथील काही व्यक्तींची विनाकारण नावे घातली आहेत. त्यामुळे या गुन्ह्याची सखोल चौकशी करून या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आलेल्या नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही चव्हाण यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.