साखर कारखाने विक्रीची चौकशी करा
By admin | Published: April 29, 2016 12:11 AM2016-04-29T00:11:41+5:302016-04-29T00:48:16+5:30
राजू शेट्टींची लोकसभेत मागणी : अधिवेशनात ‘शून्य प्रहर’मध्ये वेधले लक्ष
कोल्हापूर : महाराष्ट्रातील ३५ सहकारी साखर कारखान्यांची विक्री कवडीमोल किमतीत करून गैरव्यवहार व भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी सक्त वसुली संचालनालय (ईडी)तर्फे करावी, अशी मागणी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा अधिवेशनात शून्य प्रहर वेळेत केली. विदेशातील काळा पैसा कधी आणायचा तेव्हा आणा. मात्र, देशातील पांढऱ्या कपड्यात लपलेल्या दरोडेखोरांचा पहिल्यांदा बंदोबस्त करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील साखर उद्योगांमुळे अनेकांना वर्षातून १५० ते १७० दिवस रोजगार मिळतो. तीन कोटी ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यास ऊस पुरवठा करतो. शेतकऱ्यांच्या पैशांतून सहकारी साखर कारखाने उभारले.
मात्र, गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार यामुळे अनेक सहकारी साखर कारखाने आजारी पडले. कर्जे थकल्याने राज्य बँक, जिल्हा बँक, राज्य शासनाने सिक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत कब्जा घेऊन विकले.
एक साखर कारखाना उभारण्यासाठी ३०० कोटींची गुंतवणूक करावी लागते. प्रत्यक्षात ३५ आजारी सहकारी कारखान्यांची किमत दहा हजार कोटींपेक्षा अधिक होते. मात्र, काही राजकीय नेते स्वत:च्या फायद्यासाठी आजारी साखर कारखाने केवळ १४ ते ५० कोटी रुपयांपर्यंत लिलावात काढले.
अशाप्रकारे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील ३५ सहकारी साखर कारखाने केवळ १ हजार ७६ कोटी रुपयांना विकले आहेत. विक्रीतील कारखाने ज्या खासगी कंपन्यांनी खरेदी केली आहे. त्यांचे संचालक कोण आहेत ?, भागधारक कोण आहेत ?, खरेदीसाठी पैसा कुठून आणला ? त्याची चौकशी ‘ईडी’तर्फे करावी, अशी मागणी शेट्टी यांनी
केली. (प्रतिनिधी)
अनेक सहकारी सूतगिरण्या, कृषी प्रक्रिया उद्योग यांची खरेदी-विक्री झाली आहे. त्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा वापर झाला आहे. त्याची ‘ईडी’तर्फे चौकशी करून संबंधित सहकारी संस्थांच्या सभासदांना न्याय मिळवून द्यावा.
- राजू शेट्टी, खासदार