जैववैद्यकीय कचऱ्याबाबत ठेकेदाराची चौकशी करुन गुन्हे दाखल करा
By संदीप आडनाईक | Published: April 4, 2024 08:07 PM2024-04-04T20:07:33+5:302024-04-04T20:08:13+5:30
उध्दवसेनेचा प्रदूषण मंडळाकडे मागणी : पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
कोल्हापूर: कसबा बावडा येथील जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पातील गैरकारभाराबद्दल कोल्हापुरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिका प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची तातडीने चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाकडे दाद मागण्याचा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांची भेट घेउन निवेदन दिले. यावेळी उध्दवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, विशाल देवकुळे, संजय जाधव, राहुल माळी, अभिजित बुकशेट उपस्थित होते. हे निवेदन जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांनाही पाठवण्यात आले आहे.
या निवेदनात कसबा बावडा येथील जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पाचा गंभीर फटका शहरातील विशेषत: त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणाला बसत आहे. संशयित ठेकेदाराला ठेेका देताना तीस वर्षांचा ठेका दिला, हे देशातील एकमेव उदाहरण आहे. कचऱ्यासारख्या प्रकरणातसुध्दा नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता प्रशासन तसेच काही लोकप्रतिनिधी आर्थिक लाभ मिळवत असल्याचा आरोप केला आहे.
या आहेत मागण्या
सोलापूरमधून कचरा आणण्यासाठी प्रदूषण मंडळाने परवानगी दिली आहे का, जर खरोखरीच कोल्हापुरात आणला तर त्याचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि निर्मूलन नियमाप्रमाणे केले का, कोल्हापूर प्रकल्पावर जाळलेल्या कचऱ्याचा विल्हेवाट रिपोर्ट, डिझेल, वाहतूक बिले, वजन पावत्या, सीसीसीटीव्ही फुटेज, वाहनांचा तपशील, जीपीएस रिपोर्ट, बारकोड रिपोर्ट मिळावा, या कंपनीला जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया व निर्मूलनाचा परवाना आहे का, महापालिकेने हद्दीबाहेरील कचरा का आणला याची माहिती द्यावी.