तपास यंत्रणेचा अर्ज फेटाळला
By Admin | Published: May 21, 2016 01:11 AM2016-05-21T01:11:49+5:302016-05-21T01:13:39+5:30
पानसरे हत्याकांड प्रकरण : समीर गायकवाडवरील दोषारोप लांबणीवर; १० जूनपर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासातील सहा पुंगळ्या (काडतुसे) इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. त्या पुंगळ्या व रिपोर्ट प्राप्त होत नाही, तोपर्यंत संशयित समीर गायकवाडच्या विरोधात दोषारोप निश्चित करू नये, असा विनंती अर्ज ज्येष्ठ विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर यांनी सत्र न्यायालयास सादर केला. तो अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी फेटाळला. दरम्यान, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आली. त्यानुसार न्यायाधीश बिले यांनी दि. १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे संशयित आरोपी समीर गायकवाडच्या विरोधात शुक्रवारी होणारी दोषारोप निश्चिती लांबणीवर पडली.
पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याच्या निर्णयावर शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांच्या दालनात सुनावणी झाली. यावेळी अॅड. निंबाळकर यांनी पानसरे यांच्यावर संशयितांनी पिस्तुलातून सहा गोळ्या झाडल्या. त्या गोळ्यांच्या पुंगळ्या इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबला तपासण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.
सध्या काही मुद्देमाल न्यायालयासमोर नाही. कुठल्या पुराव्यांवर न्यायालयाने दोषारोप निश्चित करावे, हे मुद्दे समोर मांडणार होतो; परंतु मुद्देमाल समोर नसल्याने दोषारोप कोणत्या पुराव्यांवर निश्चित करायचे हे सांगू शकत नाही. न्यायालयाने न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमधून पुंगळ्यांचा (काडतुसे) तपासी अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत दोषारोप निश्चित करू नये, अशी विनंती करत अर्ज सादर केला. त्यावर आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी आक्षेप घेत दोषारोप प्रत्येकवेळी ऐनकेन प्रकारे लांबणीवर टाकले जात आहे.
पुढल्या वेळेला दुसरेच कारण पुढे येणार आहे, त्यामुळे आताच दोषारोप निश्चित करावे, अशी विनंती केली. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश बिले यांनी विशेष
सरकारी वकिलांचा अर्ज फेटाळून लावला.
दरम्यान, सरकारी वकील निंबाळकर यांनी इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठिवलेल्या पुंगळ्यांचा (काडतुसे) तपासी अहवाल जोपर्यंत सत्र न्यायालयास प्राप्त होत नाही, तोपर्यंत सत्र न्यायालयाने दोषारोप निश्चित करू नये, त्याला स्थगिती मिळावी, यासंबंधी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यावर न्यायाधीश बिले यांनी दि. १० जूनपर्यंत मुदत दिली.
सुनावणीसाठी सशस्त्र पोलिस बंदोबस्तात समीरला न्यायालयात हजर केले होते. यावेळी मेघा पानसरे, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुरवणी अहवाल सादर
पानसरे हत्येचे तपास अधिकारी तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांनी पुरवणी तपासाचा २० पानी गोपनीय अहवाल न्यायालयास सादर केला. त्यामध्ये दुसऱ्यांदा घटनास्थळाचा केलेला पंचनामा, काही पुरावे, छायाचित्रांचा समावेश आहे.