शहरातील ६० वयावरील नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:37 AM2021-02-26T04:37:20+5:302021-02-26T04:37:20+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने शहरात घरोघरी जाऊन पुन्हा सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ६० वयावरील नागरिकांसह मधुमेह, ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने शहरात घरोघरी जाऊन पुन्हा सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ६० वयावरील नागरिकांसह मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग, आदी आजारी असणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. आशा वर्कर्समार्फत तपासणी होत असून सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणाऱ्यांचे स्राव तपासणीसाठी घेतले जात आहेत. गुरुवारी दिवसभरात ८२६ लोकांचे स्राव घेतले असून, तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच आयसोलेशनसह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना तपासणीची संख्या वाढवली असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी दिली आहे.
कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. कोरोनाचे शहरात रुग्ण वाढत असतानाही काही नागरीक बेशिस्त वागत आहेत. त्यांच्याकडून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर येत आहे. यामध्ये विना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथके तैनात केली आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासोबत बाजारपेठेत आवाहनही केले जात आहे. जनजागृतीसाठी स्वतंत्र पथक तैनात केले आहे. घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणीही करण्यात येत आहे. महापालिकेने यासाठी २०० आशा वर्कर्सची नियुक्ती केली आहे. याचबरोबर काँटॅक्ट ट्रेसिंगवरही भर दिला आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास टप्प्याटप्प्याने कोरोना सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे.