शालेय पोषणमधील अपहारात नेमका कोण?, कोल्हापूर जिल्हा परिषद चौकशी समितीही संभ्रमात
By समीर देशपांडे | Published: November 1, 2024 01:46 PM2024-11-01T13:46:38+5:302024-11-01T13:46:38+5:30
पाच व्हीडीओ, ऑडिओ असलेला पेन ड्राईव्ह
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार विभागातील २८ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी चौकशी पूर्ण झाली. परंतु यात नेमका दोष कोणाचा याबाबत चौकशी समिती संभ्रमात पडली आहे. त्यामुळे चार प्रकारे हा अपहार झाला असावा, असे याबाबतच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नेमका दोषी कोण आणि या रकमेची वसुली कशी होणार, असा सवाल उपस्थित होत असून, आता नेमकी जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी याबाबत सुनावणीला लेखाधिकारी दीपक माने यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली.
१७ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या या विभागाचे लेखाधिकारी दीपक माने यांचे काही जणांनी अपहरण करून त्यांना मारहाण केली. त्यांच्या फिर्यादीनंतर अपहाराचा प्रकार समोर आला. या अपहाराची जबाबदारी घेण्यासाठीच आपले अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी दिली होती. या प्रकरणी या विभागातील कंत्राटी कर्मचारी तेजस्विनी साठे यांच्या पतीसह काही जणांना अटकही झाली. दरम्यान, साठे यांना कार्यमुक्त करण्यात आले आणि माने यांचे निलंबन करून त्यांच्या मूळ आस्थापनेकडे पाठविण्यात आले.
या प्रकरणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने १२ ऑगस्ट २४ रोजी सुनावणी घेतली आणि त्याचा अहवाल ९ सप्टेंबर रोज दिला. त्याआधीच स्वयंपाक्यांच्या मानधनाची २८ लाख रुपयांची रक्कम परस्पर साठे यांनी आपल्या नातेवाइकांच्या खात्यावर वळवल्याचे स्पष्ट झाले. चौकशी समितीने सुनावणी घेतल्यानंतरचा अहवाल मोघम असून त्यामध्ये ठोस कोणावर जबाबदार निश्चित करण्यात आलेली नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा या सर्व प्रक्रियेशी संबंधित असून यातील माने यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचा मुद्दा चौकशी समितीने मांडला आहे.
पाच व्हीडीओ, ऑडिओ असलेला पेन ड्राईव्ह
तेजस्विनी साठे आणि त्यांच्या पतींनी अपहारित रकमेबाबत कबुली दिल्याच्या क्लिप पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये चार व्हिडीओ आहेत आणि एक ऑडिओ क्लिप आहे. परंतु यामध्ये पुरुष आणि पुरुष महिला असे संभाषण ऐकू येते. तथापि संभाषणानुसार ओठांची हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या व्यक्तींचे संभाषण आहे व ते कधी झालेले आहे हे समजून येत नाही. त्यामुळे संभाषण/आवाज तज्ज्ञांकडून खात्री करणे योग्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.