निवडणुकीच्या व्यापात, गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट; आचारसंहितेच्या काळात तपास रखडला
By उद्धव गोडसे | Published: November 26, 2024 01:39 PM2024-11-26T13:39:03+5:302024-11-26T13:39:30+5:30
डिजिटल ॲरेस्ट करून भामट्यांनी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. त्या गुन्ह्यातील संशयितांचा अजून शोध लागला नाही.
उद्धव गोडसे
कोल्हापूर : लोकसभा निवडणूक संपताच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या कामात पोलिस यंत्रणा गुंतली होती. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया करणे आणि आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास पोलिसांना प्राधान्य द्यावे लागले. परिणामी, या काळात अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास रखडला आहे. निवडणूक संपताच सुटकेचा नि:श्वास सोडणाऱ्या पोलिसांसमोर आता रखडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे आव्हान असेल.
देवठाणे येथील मठात एप्रिल २०२४ च्या पहिल्या आठवड्यात वैष्णवी पोवार या तरुणीचा खून झाला होता. त्या गुन्ह्यातील बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज हे दोन्ही संशयित अजून पसार आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणांच्या विरोधात आंदोलन करताना गडाच्या पायथ्याला १४ जुलै रोजी काही घरे आणि प्रार्थना स्थळांची तोडफोड झाली होती. त्या गुन्ह्यातील म्होरके रवींद्र पडवळ आणि बंडा साळुंखे यांचा अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक घरफोड्या झाल्या आहेत. यातील एखादा अपवाद वगळता इतर अनेक घरफोड्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. कमी वेळेत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या रोज नव्या घटना समोर येत आहेत. याबाबत गुन्हे दाखल होतात, मात्र तपासात प्रगती होत नाही. जिल्हा परिषदेतील औषध खरेदी घोटाळ्याचाही तपास गतिमान करावा लागणार आहे.
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे असलेले ए. एस. ट्रेडर्स, वेल्थ शेअर, मेकर ॲग्रो, धनशांती ट्रेडर्स, बिटकॉईन आणि बनावट क्रिप्टो करन्सीबद्दलच्या अनेक गुन्ह्यांचा तपास गुन्ह्यांतील प्रमुख आरोपी आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचलेला नाही. कुरिअर किंवा पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून ऑनलाइन फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. एका उद्योजकाला डिजिटल ॲरेस्ट करून भामट्यांनी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. त्या गुन्ह्यातील संशयितांचा अजून शोध लागला नाही.
ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात प्रलंबित आहेत. अशा गंभीर गुन्ह्यांचा तपास रखडल्यामुळे संशयित आरोपी मोकाट आहेत, तर फिर्यादींची चिंता वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामातून बाहेर पडलेल्या पोलिसांनी आता रखडलेल्या गुन्ह्याचा छडा लावून फिर्यादींना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तोतया पत्रकार अजून मोकाट
लक्ष्मीपुरीतील व्यावसायिकाकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या गुन्ह्यातील तोतया पत्रकार अन्सार मुल्ला आणि त्याचा साथीदार सागर चौगुले, शशिकांत कुंभार यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यांना तातडीने पकडून खंडणीखोरांविरोधात कठोर कारवाई करीत असल्याचा संदेश पोलिसांना नागरिकांपर्यंत पोहोचवावा लागेल.
भोंदू महाराज कधी सापडणार?
जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात एका भोंदू महाराजासह त्याचा साथीदार आणि पोलिस महिलेचा समावेश आहे. या तिघांना पकडून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम रखडले आहे.
बेपत्ता शाम कुरळे यांचे काय झाले?
ज्येष्ठ साहित्यिक शाम कुरळे बेपत्ता होऊन सात महिने उलटले. त्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथकाची घोषणा पोलिस अधीक्षकांनी केली होती. मात्र, सात महिने उलटूनही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे त्यांचे नेमके काय झाले? याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.