लाच मागणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी
By admin | Published: July 18, 2016 01:07 AM2016-07-18T01:07:49+5:302016-07-18T01:09:13+5:30
नांगरे-पाटील यांचे आदेश : सुहेल शर्मा चौकशी अधिकारी
एकनाथ पाटील / कोल्हापूर
पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या सावकाराविरोधात फिर्याद देण्यास गेलेल्या तक्रारदाराकडेच एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या ‘त्या’ महिला फौजदारासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना रविवारी दिले. त्यानुसार देशपांडे यांनी तत्काळ या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे दिली.
विजय शंकर भोई (रा. गुडाळवाडी, ता. राधानगरी) यांनी नामदेव रामचंद्र पाटील (रा. वेतवडे, ता. पन्हाळा) यांच्याविरोधात खासगी सावकारीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचा तक्रार अर्ज शाहूवाडी विभागीय पोलिस उपअधीक्षकांकडे दिला होता. येथील महिला फौजदाराने सावकारावर गुन्हा दाखल न करता भोई यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार या विभागाने सापळा रचला; परंतु त्याची पूर्वकल्पना मिळाल्याने ‘ती’ महिला अधिकारी कार्यालयाकडे फिरकलीच नाही. या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलिस प्रशासनामध्ये खळबळ उडाली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करीत अशा भ्रष्ट प्रवृत्तीमुळे संपूर्ण पोलिस खाते बदनाम होत आहे. याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यासंबंधी पोलिस अधीक्षक देशपांडे यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. त्यांना आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, भोई यांनी या महिला फौजदारासह वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधातही देशपांडे यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे दिली आहे. शर्मा हे तक्रारदार भोई कुटुंबीयांसह ‘त्या’ महिला फौजदारासह तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करून लेखी जबाब घेणार आहेत.
‘एसीबी’कडून अहवाल मागविणार : देशपांडे
भोई यांच्या तक्रारीनुसार पुणे विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी साताऱ्याचे पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौंडा यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार १० जून २०१६ रोजी नाडगौंडा यांनी शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयात सापळा रचला होता. या कारवाईची माहिती व अहवालाची मागणी आज, सोमवारी केली जाईल. तो प्राप्त झाल्यानंतर दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.
तक्रारदाराकडे लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांना हे अशोभनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
- विश्वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र