‘करवीर’च्या शेवाळेसह तिघांकडे चौकशी
By admin | Published: August 1, 2016 12:44 AM2016-08-01T00:44:03+5:302016-08-01T00:44:03+5:30
वाघवे प्रकरण : वरिष्ठ स्तरावरून चौकशी
कोल्हापूर : वाघवेपैकी कुराडवाडी (ता. पन्हाळा) येथे दारूच्या नशेत घरात घुसून महिलेला व तिच्या पतीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून, ठार मारण्याची धमकी देणाऱ्या करवीर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार शेवाळे, त्यांचा दप्तरी हवालदार आबा गुंडनके अशा तिघा कर्मचाऱ्यांकडे वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू आहे.
ट्रक खरेदी-विक्रीच्या आर्थिक व्यवहारातून शिवाजी जगताप (रा. वाघवे) यांच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. याप्रकरणी चौकशीसाठी जगताप यांना पोलिस ठाण्यात न बोलविता साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार शेवाळे, त्यांचे दप्तरी हवालदार आबा गुंडनके व जीपचालक नांदगावकर हे या जुलैच्या २७ तारखेला रात्री अकरा वाजता त्यांच्या घरी गेले. यावेळी शेवाळे यांच्यासह चौघा पोलिसांनी दारू पिऊन माझ्यासह पतीला अर्वाच्च शिवीगाळ केल्याची तक्रार तारुबाई शिवाजी जगताप (वय ६०) यांनी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे केली. देशपांडे यांनी पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये साहाय्यक पोलिस निरीक्षक शेवाळे यांच्यासह सहकाऱ्यांनी जगताप यांच्या घरी गेलो होतो, परंतु मद्यप्राशन केले नव्हते. ते आम्हाला स्वत:हून चहा पिण्याचा आग्रह धरत होते. परंतु आम्ही तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून तेथून माघारी परतलो. जगताप व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ किंवा दमदाटी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्याकडे याप्रकरणी चौकशी केली असता त्यांनी जगताप यांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेवरून या वादग्रस्त पोलिसांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
शेवाळे वादग्रस्त अधिकारी
सहायक पोलिस निरीक्षक शेवाळे यांची करवीर पोलिस ठाण्यातील कारकीर्द पहिल्यापासून वादग्रस्त आहे. मध्यंतरी सावकारकीच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना पाठीशी घालून तक्रारदाराला दिवसभर पोलिस ठाण्यात तिष्ठत ठेवले होते. याप्रकरणी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. शेवाळे यांचे दप्तरी हवालदार आबा गुंडनके हे यापूर्वी पन्हाळा पोलिस ठाण्यात होते. तेथून बदली होऊन ते करवीर पोलिस ठाण्यात आले. बांदिवडे खून प्रकरणामध्ये त्यांनी ‘चांगली’ कामगिरी केली आहे. पन्हाळा तालुक्यातील घडामोडींचा अभ्यास असल्याने त्यांना सोबत घेऊन शेवाळे वाघवे गावी गेले होते.