‘मेकर’ संचालकांच्या मालमत्ता जप्त करणार : तपास अधिकाऱ्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:52 AM2018-12-21T00:52:16+5:302018-12-21T00:52:35+5:30
कोल्हापूर : जादा व्याजाच्या आमिषाने जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची ५६ कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ‘मेकर ग्रुप इंडिया’चे अध्यक्ष रमेश महादेव वळसे-पाटील ...
कोल्हापूर : जादा व्याजाच्या आमिषाने जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची ५६ कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ‘मेकर ग्रुप इंडिया’चे अध्यक्ष रमेश महादेव वळसे-पाटील याच्यासह १८ संचालकांची मालमत्ता येत्या दोन-तीन दिवसांत जप्त करण्याची कार्यवाही सुरू होईल. ठेवीदार, एजंटांकडून जमा केलेल्या पैशांतून संचालकांनी मालमत्ता खरेदी केल्याची माहिती गुंतवणूकदारांनी द्यावी. त्यासाठी स्वतंत्र विहित नमुन्यातील अर्ज भरून देण्याचे आवाहन आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तपास अधिकारी कुमार कदम यांनी केले.
जादा व्याजाच्या आमिषाने जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या ‘मेकर ग्रुप इंडिया’चे ठेवीदार, एजंट यांचा मेळावा कोल्हापुरात शाहू स्मारक भवनमध्ये गुरुवारी झाला, त्याप्रसंगी कदम बोलत होते.तपास अधिकारी कुमार कदम म्हणाले, ४४ लाख, ५२ हजार ८३१ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाला आहे. बावेली (ता. गगनबावडा) येथे कंपनीने शेतजमीन खरेदी केल्याचे चौकशीत दिसत असल्याने तेथील काहींना चौकशीसाठी पाचारण केले जाईल.
संघर्ष समितीचे निमंत्रक नाथाजीराव पोवार म्हणाले, ग्रुपचे अध्यक्ष रमेश वळसे-पाटील, मनोहर अंबुलकर, ज्ञानदेव कुरुंदवाडे, पुरुषोत्तम हसबनीस यांच्यासह एकूण १८ संचालकांच्या मालमत्ता जप्त कराव्यात. जयपाल शिखरे यांनीही फसवणुकीबाबत व्यथा मांडली.यावेळी संजय दुर्गे, अभिनंदन दुर्गे, अनिल भागाजे, धीरज पाटील, अभिनंदन धरणगुत्ते, चंद्रकांत पोतदार, पांडुरंग तांबेकर, सूर्यकांत पोतदार, मोहन शिंदे, शांताराम शिंदे, सुवर्णा सुतार, आदी उपस्थित होते.
माहिती द्या, अन्यथा एजंटही सहआरोपी
ग्रुपचे ९२ एजंट असून त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. एजंटांनी माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्यास अगर संगनमताने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी केले जाणार आहे. जमा पैशांतून संचालकांनी कोठे-कोठे मालमत्ता खरेदी केली, याची माहिती एजंटांनी द्यावी, असे आवाहन कदम यांनी केले.
‘मेकर ग्रुप इंडिया’कडून फसवणुकीप्रकरणी एजंट, गुंतवणूकदारांच्या कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये गुरुवारी झालेल्या मेळाव्यात आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तपास अधिकारी कुमार कदम यांनी मार्गदर्शन केले. समोर उपस्थित एजंट, गुंतवणूकदार.
निवृत्तीनंतर जमा झालेल्या सर्व पुंजीची या कंपनीत गुंतवणूक केली. मुदत संपल्याने पैसे नेण्यासाठी गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
- बाळासाहेब भोजे, ठेवीदार
गावातील २७ गुंठे जमीन विकून जादा व्याज मिळेल म्हणून या कंपनीत गुंतवणूक केली; पण फसवणूक झाल्याने आता काय करावे हेच समजेना झाले आहे.
- सुवर्णा पाटील, ठेवीदार