म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरक्षित, लाभदायक, विश्वासपात्र
By admin | Published: May 3, 2017 12:34 AM2017-05-03T00:34:10+5:302017-05-03T00:34:10+5:30
गुंतवणूकदारांना मार्गदर्शन : लोकमत, रिलायन्स म्युच्युअल फंडातर्फे कार्यशाळा
कोल्हापूर : देशात उद्योग-व्यवसाय वाढत असताना लोकांची मिळकतही वाढली आहे. मात्र, अर्थव्यवस्थेच्या विकासात होणाऱ्या चढउतारांमुळे नागरिकांमध्ये जीवनातील गरजा पूर्ण करण्याबाबत चिंता पसरली आहे. घामाचा पैसा कुठे गुंतविल्यास अधिक लाभ मिळेल, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अशा वेळी म्युच्युअल फंड हा सर्वाधिक सुरक्षित, लाभदायक आणि विश्वासपात्र गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे प्रतिपादन रिलायन्स म्युच्युअल फंडचे तज्ज्ञ कपिल पवार यांनी केले. हॉटेल वृषाली येथे ‘लोकमत’ आणि ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ यांच्यातर्फे शनिवारी आयोजित ‘तुमच्या आर्थिक यशाची गुरुकिल्ली’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी गुंतवणूक सल्लागार अनिल पाटील, कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनचे मनीष झंवर, अर्थतज्ज्ञ विजय ककडे, ‘लोकमत’चे वरिठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख उपस्थित होते. ते म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे घर, मुलांचे शिक्षण, कारची खरेदी आणि देश-विदेशांत पर्यटन करण्याचे स्वप्न असते आणि ते साकार करण्यासाठी सामान्य व्यक्ती दिवस-रात्र मेहनत करीत असते. कमी वेळात अधिक लाभ मिळेल, अशा ठिकाणी घामाचा पैसा गुंतविण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. सामान्यपणे बँक एफडी, रिअल इस्टेट, सोने खरेदी, शेअर मार्केट, विमा, म्युच्युअल फंड, आदी पर्याय गुंतवणुकीसाठी निवडले जातात. स्वर्णखरेदी किंवा रिअल इस्टेट क्षेत्र अस्थिर असल्याने या ठिकाणी गुंतवणूक करणे लाभदायक ठरताना दिसत नाही. यातून मिळकत मिळेलच असा भरवसा नाही. दुसरीकडे, बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित असले तरी मिळणाऱ्या व्याजापेक्षा महागाई अधिक वाढत असते.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याबाबत अनुभव असणे अत्यावश्यक आहे. मात्र, हे गुंतागुंतीचे क्षेत्र असल्याने सामान्य नागरिकांना ते सहज शक्य नाही. विम्याचे क्षेत्रही तेवढे व्यापक आणि लाभदायक नाही. अशा परिस्थितीत केवळ म्युच्युअल फंड हे असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने अधिक लाभ आणि तुमच्या पैशाला स्थायित्व मिळू शकते. या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी व्यक्ती अनुभवी असण्याची गरज नाही किंवा कमीत कमी पैशाची सीमा नाही.
म्युच्युअल फंडांवर भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्डाचे (सेबी) नियंत्रण असते. म्युच्युअल फंड विविध प्रकारांत उपलब्ध असून एकमुक्त किंवा थोड्या पैशांतही ते खरेदी केले जाऊ शकतात. डेब्ट फंड, इक्विटी आणि एसआयपी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. पैसा गुंतविल्यानंतर संबंधित कंपन्यांचे अनुभवी फंड मॅनेजर गुंतवणूकदारांचा पैसा योग्य ठिकाणी खर्च करतात व यातून मिळणारा फायदा गुंतवणूकदारांनाच मिळतो. चांगला फायदा मिळविण्यासाठी नागरिकांनी धैर्य ठेवावे, असेही आवाहन त्यांनी केले. अनिल पाटील म्हणाले, नोकरीला लागल्यावर प्रत्येकाने आपल्या ध्येयधोरणांचा आराखडा केला पाहिजे. रोख, बचत आणि गुंतवणूक असे प्रकार असतात. त्यांत उपलब्ध पैसा, वेळेची सांगड घालून गुंतवणूक केली पाहिजे. विजय ककडे म्हणाले, तरुण पिढीने आर्थिक नियोजनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. दिवसेंदिवस महागाई आणि विकासदराचा निर्देशांक वाढत आहे. अशावेळी पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेली गुंतवणूक उलट नुकसानदायक ठरू शकते. या गुणोत्तर प्रमाणातून बाहेर येत आपल्याला अधिक परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंडासारख्या क्षेत्रावर विश्वास ठेवला पाहिजे. सुखदा आठले यांनी सूत्रसंचालन केले.
‘म्युच्युअल फंड डे’ महिन्याच्या ७ तारखेला
दरवर्षी आपण अनेक ‘डे’ साजरे करतो; मात्र आयुष्यात महत्त्वाची गोष्ट असलेल्या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष होते. नागरिकांना गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी ‘रिलायन्स’तर्फे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला ‘म्युच्युअल फंड डे’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती कपिल पवार यांनी दिली.
उपस्थितांच्या प्रश्नांचे समाधान
कार्यशाळेवेळी नागरिकांनी तज्ज्ञ मान्यवरांना म्युच्युअल फंडाशी संबंधित प्रश्न विचारले. मान्यवरांनीही विस्तारपूर्ण उत्तरे दिली. म्युच्युअल फंडांचे प्रकार, लाभाची मर्यादा, कालावधी, आदी शंकांचे यावेळी समाधान झाले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.
स्वत:च खबरदारी घ्या
म्युच्युअल फंड हा तसा बाजाराच्या जोखमीचा विषय आहे. गुंतवणुकीपूर्वी प्रत्येकानेच संबंधित कागदपत्रांचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे व गुंतवणूक करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे.
कोल्हापुरातील हॉटेल वृषाली येथे ‘लोकमत’ आणि ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’तर्फे शनिवारी आयोजित ‘तुमच्या आर्थिक यशाची गुरुकिल्ली’ या विषयावरील कार्यशाळेत कपिल पवार यांनी मार्गदर्शन केले