'दामदुप्पट'चा परतावा नाही, गुंतवणूकदार हवालदिल; कोल्हापुरातील १४१ लोकांचे ८५ लाख अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 12:09 PM2022-05-13T12:09:28+5:302022-05-13T12:10:15+5:30

कंपनीचा म्होरक्या दुबईला पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची कार्यालयेही बंद असून, जानेवारीपासून दरमहा मिळणारी परताव्याची रक्कम बंद झाल्याने गुंतवणूकदारांना पैशासाठी टाचा घासायची वेळ आली आहे.

Investment by showing the lure of a double plan, 85 lakh of 141 people trapped in Kolhapur | 'दामदुप्पट'चा परतावा नाही, गुंतवणूकदार हवालदिल; कोल्हापुरातील १४१ लोकांचे ८५ लाख अडकले

'दामदुप्पट'चा परतावा नाही, गुंतवणूकदार हवालदिल; कोल्हापुरातील १४१ लोकांचे ८५ लाख अडकले

Next

विश्वास पाटील

कोल्हापूर : दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला भाग पाडलेल्या सांगलीतील तीन कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. या कंपनीचा म्होरक्या दुबईला पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची कार्यालयेही बंद असून, जानेवारीपासून दरमहा मिळणारी परताव्याची रक्कम बंद झाल्याने गुंतवणूकदारांना पैशासाठी टाचा घासायची वेळ आली आहे. अशा फसवणुकीच्या बातम्या रोज येत असतानाही लोक कष्टाचे पैसे आमिषापोटी अशा बनावट कंपन्यांमध्ये गुंतवत आहेत. माझे पैसे मिळाले, पुढे काय व्हायचे ते होईल, अशी मानसिकता त्यामागे आहे.

फक्त नावांतच ‘स्मार्ट’ असलेल्या व पैशाचा ‘ट्रेड’ करून ‘ग्लोबल’ होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या या कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या न कष्ट करता जादा कमाई करण्याच्या हव्यासाचा फायदा उठवला आहे. मूळ योजनेनुसार एक लाख रुपये भरल्यावर महिन्याला १० हजार मुद्दल व ५ हजार नफा असे १५ हजार रुपये ११ महिने मिळणार होते. त्यानुसार एकेकाने दोन लाखापासून सोळा लाखापर्यंत या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. त्यांना सुरुवातीचे सहा महिने बँक खात्यावर परतावे जमा झाले; परंतु गेली सहा महिने हे परतावे बंद झाले आहेत.

कार्यालयात कोण भेटत नाही, कोण फोन उचलत नसल्याने गुंतवणूकदारांचा रक्तदाब वाढला आहे. शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्राच्या हमीवर ही लाखांतील गुंतवणूक झाली आहे. शिक्षकापासून सरकारी कर्मचारी व व्यावसायिकांपासून किराणा दुकानदारांपर्यंत सर्व स्तरांतील लोकांनी ही गुंतवणूक केली आहे. समाजातील शहाणा समजला जाणारा हा वर्गच आमिषाला भुलून गोत्यात आला आहे.

तीन बँकांमध्ये व्यवहार

या कंपन्यांचे एचडीएफसी बँक सांगली, एस बँक मुंबईमध्ये व्यवहार आहेत. कंपनीने या बँकांचे धनादेश गुंतवणूकदारांना दिले आहेत. ते बँकेत भरल्यानंतर या कंपन्यांची खाती बंद करण्यात आल्याचे सांगून चेक परत आले आहेत. गंमत म्हणजे पैसे एका कंपनीने भरून घेतले आहेत व त्याचा परतावा मात्र दुसऱ्याच कंपन्यांच्या खात्यावरून दिला गेला आहे.

टीडीएसलाही दांडी..

या कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून त्यांचा परतावा देताना टीडीएस कपात करून घेतला आहे. प्रत्यक्षात ही रक्कम त्यांनी प्राप्तीकर खात्याकडे भरलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्याचीही अडचण येत आहे.

पोलिसांत तक्रार करणार

कोल्हापुरातील विविध सरकारी खात्यात नोकरी करणारे व त्यातही महावितरणमधील बहुतांशी लोकांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यातील १२२ लोकांचे ८५ लाख व १९ लोकांनी डॉलरमध्ये ४७०० डॉलर इतकी गुंतवणूक केली आहे. या सर्व लोकांनी किती रकमेची किती तारखेला गुंतवणूक केली, त्यांना किती पैसे मिळाले, कोणत्या बँकेतून मिळाले, याची यादी लोकमतकडे उपलब्ध आहे.

जानेवारी पासून पैसा परत नाही

या कंपनीचे मालक असलेल्या व्यक्तीकडून गुंतवणूकदारांना भलीमोठी आश्वासने दिली गेली आहेत. मुदतीआधी तुम्हाला पैसे हवे असतील तर रक्कम कितीही लाख असू देत..दोन तासांत तुमच्या खात्यावर पैसे जमा करतो, असे तो चुटकी वाजवून सांगत होता; परंतु आता जानेवारीपासून एकही पैसा परत मिळालेला नाही. त्याचे पाठिराखे मात्र आम्ही सगळ्यांना मॅनेज केले असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना दरडावत आहेत.

Web Title: Investment by showing the lure of a double plan, 85 lakh of 141 people trapped in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.