मोहरे येथे कॅनाॅलच्या अर्धवट कामामुळे अपघातास निमत्रंण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:24+5:302020-12-08T04:20:24+5:30
परिसरातील बच्चे सावर्डे, आमतेवाडी, शिंदेवाडी, आरळे, मोहरे, काखे, कोडोली, आदी गावांमधील जमिनी शासनाने संपादित करून सन २००६ मध्ये प्रत्यक्ष ...
परिसरातील बच्चे सावर्डे, आमतेवाडी, शिंदेवाडी, आरळे, मोहरे, काखे, कोडोली, आदी गावांमधील जमिनी शासनाने संपादित करून सन २००६ मध्ये प्रत्यक्ष कामकाजास पाटबंधारे विभागाकडून काम सुरू करण्यात आले. संबंधित कॉन्ट्रक्टर यांच्या मदतीने वारणा उजवा कालव्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केल्याने शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले; मात्र कालांतराने शासकीय निधीची कमतरता भासल्याने संबंधित ठेकेदारांनी कामे अर्धवट स्थितीत सोडून दिली. यामुळे परिसरातील मुख्य रस्त्यांची वाताहात झाली, तर रस्त्यावरील पुलांची बांधकामे ठप्प झालीत. मुख्य रस्त्यावरती पुलाऐवजी दगडांचे भराव टाकून रस्ते खुले करण्यात आले आहेत. सध्या परिसरातील रत्नागिरी-वाठार या महामार्गास जोडणारा काखे फाटा ते सांगली जिल्ह्यास जोडणाऱ्या रस्त्याला हा कालवा मोहरे-काखे सीमेवरील चांदोली वसाहत शेजारी वारणा उजवा कालवा (कॅनॉल)छेदत असून, या ठिकाणी ४० फूट खोल खुदाई केलेला भाग असून, पूर्वेकडून वळण घेऊन कालव्यात भराव टाकून तात्पुरता रस्ता तयार केला आहे. सध्या या ठिकाणी तुटलेल्या रस्त्याला दिशादर्शक फलक नसल्याने बाहेरगावी प्रवाशांना वळण असल्याचे लक्षात येत नाही, परिणामी या ठिकाणी गंभीर अपघात होऊन शिराळा तालुक्यातील एका तरुणाला जीव गमवावा लागला असून, एकजण गंभीर जखमी झाला होता. अशीच परिस्थिती सावर्डे, थेरगाव, सातवे, शिंदेवाडी, आमतेवाडी, दरम्यानच्या रस्त्यावरती असून, अशा धोकादायक आघातजन्य जागी तातडीने पूल बांधून रस्ते वाहतुकीस पूर्ववत करावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
फोटोओळ : उजवा कालवा (कॅनवॉल) अरुंद रस्त्यावरून धोकादायक ऊस वाहतूक करताना वाहन चालक (छाया : संजय पाटील)