अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे आजाराला निमंत्रण
By Admin | Published: July 28, 2016 12:22 AM2016-07-28T00:22:28+5:302016-07-28T00:54:24+5:30
विद्यार्थिनींना संसर्ग : शाळा व्यवस्थापनाने प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज
कोल्हापूर : शाळांमधील अस्वच्छ स्वच्छतागृहांमध्ये जाण्यामुळे किंवा तेथील अस्वच्छतेमुळे तेथे जाणे टाळल्याने विद्यार्थिनींना संसर्ग होऊन आजारांची लागण होते. युरिन संसर्ग, मूत्राशयाच्या पिशवीला सूज, पोटात सूज येणे, पोट दुखणे, मूत्राशयातील खडे यासह ताप, उलटी, डोकेदुखी अशा व्याधींची लागण होते. त्यामुळे शहरातील सर्वच शाळांच्या व्यवस्थापनाच्या पातळीवर हा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज आहे.
‘शाळांमधील स्वच्छतागृहांचे डर्टी पिक्चर’ हे वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. या सर्व्हेतील शाळांमधील स्थिती प्रातिनिधीक स्वरूपात मांडली असली तरी जवळपास सगळ््याच शाळांमधील स्वच्छतागृहे कमी-अधिक प्रमाणात अस्वच्छच आहेत. शहरातील अनुदानित, विनाअनुदानित असोत किंवा खासगी शाळा. शहरातील काही महत्त्वाच्या शाळांकडे पालकांचा अधिक ओढा असतो. मात्र, पाणी आणि सफाई कामगारांच्या हलगर्जीपणामुळे आजही शहरातील चांगल्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे विदारक चित्र दिसते. या अस्वच्छतेमुळे मुली स्वच्छतागृहांत जाणे टाळतात. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळते.
पाणी न पिण्याचे दुष्परिणाम
स्वच्छतागृहात जावे लागू नये म्हणून मुली पाणी पिण्याचे टाळतात. मात्र, दिवसाला किमान तीन लिटर पाणी पिणे ही शरीराची गरज असते. लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण दोन लिटर इतके असावे. मात्र, पुरेशा प्रमाणात पाणी न पिण्याने मुतखडा होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यातच शाळेत गेल्यानंतर विद्यार्थिनी चिप्स, वडा-पावसारखे जंकफूड खातात त्याचे पचन व्यवस्थित होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते.
- डॉ. विनय चौगुले, न्यूरोलॉजिस्ट
विद्यार्थिनींकडूनही सहकार्य हवे
शाळेत विद्यार्थिनींच्या प्रमाणात पुरेशी स्वच्छतागृहे आहेत; पण मुलींची संख्या जास्त असल्याने वारंवार स्वच्छता करावी लागते. दोनवेळा सफाई कर्मचारी काम करतात. स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शाळेसोबतच विद्यार्थिनींचीदेखील असल्याने त्यांनी याचे भान राखले पाहिजे. पालकांनीही तशा सूचना द्यायला हव्यात.
- पी. पी. घोलप, मुख्याध्यापिका