रात्रीचा प्रवास अपघाताला निमंत्रणच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:50 PM2020-03-05T18:50:04+5:302020-03-05T18:52:34+5:30
कोल्हापूर ते मुंबई जाण्या-येण्यासाठी हजार-दीड हजार रुपये मिळत असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनांच्या चालकांचे काम सुरू आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई जाण्या-येण्यासाठी हजार-दीड हजार रुपये मिळत असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनांच्या चालकांचे काम सुरू आहे.
कायम एकाच गाडीवर राहिले तर फार तर सहा-सात हजार पगार भेटतो, त्यापेक्षा रोज वेगळ्या गाडीवर काम केले तर त्यापेक्षा जादा पैसे व रात्रीचा वेगळा भत्ताही मिळत असल्याने त्याकडे कल वाढला असून, त्यातूनच चालक जोखीम घेऊन प्रवास करतात. सकाळी मुंबईहून आल्यानंतर रात्री पुन्हा मुंबईला जातात, झोप पुरेशी होत नसल्यानेच पहाटेच्या वेळी डुलकी येते आणि त्यातूनच अपघात होतो.
जिल्हा बॅँकेचे कर्ज विभागाचे व्यवस्थापक रणवीर उदाजीराव चव्हाण यांचा मंगळवारी पहाटे पनवेलजवळ अपघातात मृत्यू झाला. चव्हाण हे घोरपडे साखर कारखान्याचे अधिकारी दीपक चव्हाण यांच्या गाडीतून गेले होते. चव्हाण यांनी बाहेरील चालक घेतला होता. मृत्यू कोणालाही रोखता येत नसला तरी काळजी घेणे आपल्या हातात असते. रात्री दहा वाजता कोल्हापुरातून ते निघाले आणि पहाटे अपघात झाला.
अपघातामध्ये चूक कोणाची हा विषय वेगळा असला तरी मुळात रात्रीचा प्रवास किती सुरक्षित हे पाहणे महत्त्वाचे आहे. रणवीर चव्हाण व दीपक चव्हाण हे दिवसभर आपापली कामे करून रात्री मुंबईकडे रवाना झाले. चालक घेतला तो दिवसभर झोपला होता का? त्याची कदाचित विचारपूस न करता ते निघाले.
रात्रीचे जेवण आणि महामार्गावर रात्रीची वाहने एकदम सुसाट असल्याने वेगाने निघाले. त्यात महामार्गावर किमान १० ते १५ किलोमीटर विनागेअर बदलता गाडी एकसारखी चालते. हे सर्वांत धोकादायक असून या कालावधीत डोळ्यावर झापड येते आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते होते.
वेळेची बचत अन्.....
प्रत्येक क्षेत्रात धावपळ वाढल्याने प्रत्येकजण वेळेची बचत करण्याच्या मागे लागला आहे. मुंबईला काम असेल तर रात्रीचे निघायचे, सकाळी पोहचल्यानंतर दिवसभर काम करायचे आणि पुन्हा रात्री कोल्हापूरकडे निघायचे, असेच प्रयोजन असते. वेळेची बचत होते मात्र, आयुष्याचा वेग थांबतो.
लक्झरी, एस.टी.चा प्रवास सुरक्षित
मुंबईला तातडीने जायचे असेल तर लक्झरी अथवा एस. टी. महामंडळाच्या वातानुकूलित बसेस असतात. त्यांच्याकडे दोन-दोन चालक असतात, ठरावीक अंतरानंतर ते बदलत असल्याने त्यातून प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकतो.