कोरोनामुक्तीच्या लढ्यात गावांचा सहभाग घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:42+5:302021-05-21T04:25:42+5:30
कोल्हापूर : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गावागावांतील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा सहभाग वाढवा, स्थानिक समित्या करून त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, लसीकरण, होम ...
कोल्हापूर : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गावागावांतील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा सहभाग वाढवा, स्थानिक समित्या करून त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, लसीकरण, होम क्वारंटाइन, आयसोलेशन अशा जबाबदाऱ्या सोपवा, एक एक गाव कोरोनामुक्त करत जा, आपल्या जिल्ह्यात राबवलेल्या प्रभावी उपाययोजना केंद्र शासनाकडे पाठवा त्या देशभर राबवण्यात येतील अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.
काेरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशात मोठा संसर्ग झाला असून या कठीण काळात काम करत असलेल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील १७ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे मुख्य सचिव उपस्थित होते. कोल्हापुरातून जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते. या संवादानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीची माहिती पत्रकारांना दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्याच्या कठीण काळात गावागावात आलेला कोरोना रोखण्यासाठी व गाव कोरोनामुक्त करण्यासाठी तेथील नागरिकांचा व लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्या, एखाद्या गावात कमी रुग्ण असतील तर तेथील बाधितांची संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न करा, एक एक गाव कोरोनामुक्त करत पुढे जा. त्यामुळे अधिक संवेदनशील किंवा हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी प्रशासनाला अधिक प्रभावीपणे काम करता येईल. अन्य गावांमुळे येणारा ताण कमी होईल. आपण जिल्ह्यात राबवलेल्या कोणत्या उपाययोजना प्रभावी ठरल्या त्या केंद्र शासनाकडे पाठवा, या उपाययोजना देशभर राबवले जातील. सर्वकष प्रयत्नातून आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरदेखील विजय मिळवू. आपण सगळे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहातच. यापुढेही असेच कार्यरत राहा, अशा शब्दात त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधानांचे मुख्य सचिव यांनी सुरुवातीला देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. अहमदनगर येथील अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.
--
प्रशासन हेच पहिले कोरोना योद्धे
कोरोनाविरोधातील लढाईत सर्व राज्यांमधील जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची भूमिका आहे, येथून सर्व नियोजन होते, त्याची अंमलबजावणी, नागरिकांना वैद्यकीय सोयी- सुविधा पुरवणे या सगळ्यांचा प्रशासनावर मोठा ताण असतो. त्यामुळे प्रशासनात काम करणे जिल्हाधिकारी व सर्व अधिकारी हे पहिले कोरोना योद्धे आहेत, असा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी सर्व अधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढवले.
--