बनावट औषध पुरवठ्यात कोल्हापूरच्या ‘विशाल एन्टरप्रायझेस’चा सहभाग, नागपूरमध्ये गुन्हा दाखल
By उद्धव गोडसे | Published: October 23, 2024 07:16 PM2024-10-23T19:16:54+5:302024-10-23T19:17:15+5:30
देशभर मोठे रॅकेट, उत्पादकांचा शोध सुरू
उद्धव गोडसे
कोल्हापूर : नागपूरमधील शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातमधील चार पुरवठादारांवर गुन्हा दाखल केला. यात कोल्हापुरातील बाबूजमाल रोड येथील ‘विशाल एन्टरप्रायझेस’ फर्मचा सहभाग आहे. फर्मचे मालक सुरेश दत्तात्रय पाटील यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, बनावट औषधांच्या उत्पादकांचा शोध सुरू आहे. देशभर पसरलेल्या रॅकेटमधून कोट्यवधी रुपयांची बनावट औषधे विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नागपूर येथील औषध निरीक्षक नितीन पद्माकर भांडारकर (वय ५८, रा. नागपूर) यांनी २१ ऑगस्ट २०२३ मध्ये तेथील शासकीय रुग्णालयातील औषधांची तपासणी केली. कोल्हापुरातील विशाल एन्टरप्रायझेस या कंपनीने पुरवलेल्या ७७ हजार ३७० गोळ्या बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित कंपनीस पत्रव्यवहार केेला. ‘विशाल एन्टरप्रायझेस’ने या गोळ्या सुरत (गुजरात) येथील कंपनीकडून मागवल्याचे सांगितले.
सुरतमधील कंपनीने मुंबईतील भिवंडी येथील कंपनीकडे बोट दाखवले. भिवंडीमधील कंपनीने ठाणे येथील कंपनीतून गोळ्या मागवल्याचे सांगितले. मात्र, ठाण्यातील कंपनीच्या पत्त्यावर पाहणी केली असता, गोळ्यांचा पुरवठा केलेली कंपनी बंद झाली असून, त्या ठिकाणी नवीन कंपनी सुरू झाल्याचे निदर्शनास आले. बनावट औषधांचा पुरवठा करून रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याबद्दल औषध सुरक्षा अधिकारी भांडारकर यांनी नागपुरातील अजनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दोघांना अटक
बनावट औषधांच्या उत्पादक कंपनीचा शोध घेण्याचे काम नागपूर पोलिसांकडून सुरू आहे. या गुन्ह्यातील मिहिर त्रिवेदी (रा. भिवंडी, मुंबई) आणि विजय शैलेंद्र चौधरी (रा. ठाणे) या दोघांना अटक झाली आहे. बनावट औषधांच्या रॅकेटमधील अन्य संशयितांना अटक झाल्यानंतर मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.