सीपीआरमध्ये रुग्णांची तर बाहेर नातेवाइकांची घालमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:23 AM2021-04-18T04:23:21+5:302021-04-18T04:23:21+5:30
कोल्हापूर : कुणाचा मुलगा, कुणाची बायको, कुणाचा चुलता, कुणाचा भाऊ, कुणाचे वडील, कुणाची आई कोरोनाग्रस्त म्हणून सीपीआरमध्ये उपचार घेत ...
कोल्हापूर : कुणाचा मुलगा, कुणाची बायको, कुणाचा चुलता, कुणाचा भाऊ, कुणाचे वडील, कुणाची आई कोरोनाग्रस्त म्हणून सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना प्रशासनाकडून औषध उपचाराच्या जोडीने जेवण, नाश्त्याचीही मोफत सोय आहे; पण त्यांच्या सेवेसाठी म्हणून आलेल्या नातेवाइकांसाठी रुग्ण बरा होईपर्यंत पाणपोईसमोरील छाेटीशी बाग हेच घर बनले आहे. येथे रुग्णाच्या काळजीने चिंतातुर झालेले चेहरे एकमेकांच्या आधाराने येणाऱ्या प्रत्येक दिवसाला नव्या अनुभवाने सामोरे जात आहेत.
सीपीआर हे शंभर टक्के कोविड रुग्णालय घोषित करण्यात आले आहे. ४५० खाटांच्या या रुग्णालयात सध्या २००च्यावर कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. सर्व उपचार अत्याधुनिक व मोफत होत असल्याने येथे येण्यास प्रथम प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या देखभालीसाठी मागील वर्षी काेणाही नातेवाइकाला थांबवून घेतले जात नव्हते; पण यावेळी मात्र नातेवाइकांना थांबण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे एका रुग्णासोबत एक ते दोन नातेवाईक सीपीआरमध्ये दिवसरात्र थांबून आहेत. रुग्णाने मागणी केली तर जेवण, चहा, नाश्ता पुरवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांना थांबण्यासाठी निवाऱ्याची कोणतीही सोय सीपीआरमध्ये उपलब्ध नसल्याने दिवसा हा बागेतील कट्टा आणि रात्री सीपीआरच्या जुन्या इमारतीतील व्हरांडा असे चक्र सुरू आहे. सामानाने भरलेली पिशवी उशाला घेऊन चटई कट्ट्यावर अंथरून हे नातेवाईक डॉक्टर, सिस्टरच्या निरोपाची वाट पाहत बसून असतात. त्यांना पै पाहुणे, गावाकडून जेवणाचे डबे येतात, चहा नाश्ता टपरीवर घेतात. रुग्ण दाखल होऊन डिस्चार्ज होईपर्यंत किमान १० ते १५ दिवसांचा कालावधी लागत असल्याने तितका वेळ हे नातेवाईक येथे ऊन, वारा, पाऊस झेलत बसून आहेत.
चौकट ०१
सीसीटीव्ही फुटेजचा आधार
रुग्णांची आठवण आली की सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रीकरण पाहून समाधान मानतात. आपला माणूस व्यवस्थित जेवत आहे, त्याला काही त्रास तर होत नाही ना हे भरल्या डोळ्यांनी चित्रीकरणातूनच पाहतात.
चौकट ०२
सीपीआरकडून चांगली मदत...
उपवडे (ता. करवीर) येथील सरदार पाटील यांचा मुलगा येथे उपचार घेत आहे. त्यांच्या सेवेसाठी दहा दिवसांपासून पाटील हे
वयोवृद्ध गृहस्थ सेवेसाठी येथे थांबून आहेत. गावाकडे जनावरे आहेत, घरच्या महिलांवर जबाबदारी सोपवून ते येथे राहत आहेत. मालेवाडी (ता. शाहूवाडी) येथील बाबूराव दळवी हे गेल्या १२ दिवसांपासून मुलगा पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात दाखल केल्यापासून राहत आहेत. घराकडची सर्व जबाबदारी पत्नी व सुनेवर सोपवून ते येथे राहत आहेत. सीपीआर प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत होते, उपचारही चांगले होत आहेत असे ते आवर्जून सांगतात.
फोटो: १७०४२०२१-कोल- कोरोना सीपीआर
फोटो ओळ : कोल्हापुरातील सीपीआर जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी आलेल्या नातेवाइकांसाठी निवाऱ्याची सोय उपलब्ध नसल्याने असे बाहेर बसूनच प्रतीक्षा करावी लागत आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)