आयपीएस डॉ. निलाभ रोहन यांची बदली रद्द करा-इचलकरंजीतील नागरिक, विविध पक्ष, संघटनां रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:13 PM2018-11-21T14:13:50+5:302018-11-21T14:18:25+5:30
नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन (आयपीएस) यांची तडकाफडकी केलेली बदली रद्द करावी या मागणीसाठी बुधवारी इचलकरंजी शहरातील नागरिक, विविध पक्ष, संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.
इचलकरंजी : नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन (आयपीएस) यांची तडकाफडकी केलेली बदली रद्द करावी या मागणीसाठी बुधवारी इचलकरंजी शहरातील नागरिक, विविध पक्ष, संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेस व एनएसयुआय संघटनेतर्फे रास्तारोको करण्यात आला. तर व्हिजन इचलकरंजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांना निवेदन देण्यात आले.
प्रसंगी उच्य न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला. अधिकारी डॉ. रोहन यांनी महिन्याभरापूर्वी पदभार स्विकारला होता. त्यानंतर त्यांनी अवैध व्यवसायाविरोधात धडाकेबाज कारवाई करून अवैध व्यवसायाला चाप लावला. एैन दिवाळीत सर्वसामान्यांना लूटणार्या जुगार क्लबवरील कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते. मात्र मंगळवारी अचानकपणे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. डॉ. निलाभ रोहन यांच्या बदलीचे वृत्त समजताच शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निलाभ रोहन यांना खांद्यावर उचलून घेत त्यांच्या कार्याला सलाम करत बदली रद्द झालीच पाहिजे अशा घोषणां देत संपूर्ण चौक दणाणून सोडला.