इराणी, बंडारू यांच्या राजीनाम्याची मागणी
By admin | Published: January 23, 2016 12:00 AM2016-01-23T00:00:13+5:302016-01-23T00:50:05+5:30
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण : काँग्रेसतर्फे गडहिंग्लजला मोर्चा; इचलकरंजीत निदर्शने
गडहिंग्लज/इचलकरंजी : वाढती महागाई व असहिष्णुतेसह हैदराबाद येथील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व बंडारू दत्तात्रेय यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी युवक काँगे्रसतर्फे येथील प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. तर इचलकरंजी येथे के. एल. मलाबादे चौकात काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
गडहिंग्लमध्ये लक्ष्मी मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गांवर फिरून मोर्चा प्रांतकचेरीसमोर आला. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात, हैदराबाद येथील दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येची नि:पक्ष चौकशी व्हावी, संजय गांधी पेन्शन योजनेची रक्कम किमान एक हजार रुपये करावी, बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना पुन्हा सुरू कराव्यात, आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चात प्रदेश सचिव धु्रवी लकडे, शंभूराजे देसाई, विद्याधर गुरबे, रंगराव मेतके, प्रशांत देसाई, वैभव ताशीलदार, संदीप पाटील, राम पाटील, उत्तम आंबवडेकर, सरदार पाटील, दीपक थोरात, दिग्विजय कुराडे, रूपाली पाटील, आदींसह युवक-युवती सहभागी झाले होते.
इचलकरंजी शहर काँग्रेस समितीच्यावतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात येथील के. एल. मलाबादे चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव, केंद्रीय मंत्री आणि कुलपती बंडारू दत्तात्रय व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, शामराव कुलकर्णी, अहमद मुजावर, रवी रजपुते, अविनाश कांबळे, आदींची भाषणे झाली. शेखर शहा, रमेश कबाडे, संजय केंगार, के. के. कांबळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरोळमध्ये मेळाव्यात निषेध, कँडल रॅली
शिरोळ येथे तालुका युवक कॉँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. अध्यक्षस्थानी प्रदेश कॉँग्रेसच्या सरचिटणीस धु्रवीताई लकडे होत्या. यावेळी अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस ऋत्वीज जोशी, जयराज पाटील, सचिन माच्छरे, उपसरपंच पृथ्वीराज यादव, अमृत भोसले, रणजितसिंह पाटील, जवाहर सलगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.