इराणी खणीत २१ फुटी ५ गणरायासह पावणे तीनशे गणेशमूतीँचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:47 PM2017-09-06T14:47:00+5:302017-09-06T14:52:32+5:30
कोल्हापूर : उपनगरातील गणेशमूर्ती व २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावजवळील इराणी खण व त्या शेजारील खणीत मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत २७४ हून अधिक लहान मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जन पाहण्यासाठी अबालवृद्धांनी दोन्ही खणींभोवती मोठी गर्दी केली होती.
इराणी खणीत मंगळवारी सकाळी ८ वाजता हनुमान तरुण मंडळ (पाचगाव) येथील ७ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनाने सुरुवात झाली. त्यानंतर टेेंबेरोडवरील जादू गु्रप, आयोध्या कॉलनी मित्रमंडळ, बरसो रे बरसो मित्र मंडळ, पटेल मित्र मंडळ, कृष्णकृष्णाई मित्र मंडळ या मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जीत करण्यात आल्या.
दुपारी दोन वाजेपर्यंत ५९ मंडळांच्या गणेशांचे विसर्जन झाले होते. तर सायंकाळी साडेपाचपर्यंत १४६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. साडेसातनंतर मिरवणूकीला गती आली. रात्री साडेअकरा वाजता २ ३० इतक्या मंडळांनी आपल्या गणरायाचे विसर्जन केले. रात्री अकरानंतर विसर्जनाचा वेग मंदावला.
बुधवारी पहाटेपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत २७४ मंडळांनी आपल्या गणरायाचे विसर्जन केले. मंडळाच्या मिरवणूकीत महीलांचा सहभाग उत्स्फूर्त होता. यात महीलांनी भगवे फेटे बांधले होते. श्रमिक युवा मित्र मंडळ(विक्रमनगर) च्या गणरायाचा समावेश होता. दरम्यान गणेश विसर्जन येणाºया मंडळांना सतेज पाटील फौंडेशन व नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यातर्फे मानाचे श्रीफळ देण्यात आले.
ढोल ताशा, स्टेरिओ ला अधिक पसंती
यंदा डॉल्बीला बंदी असल्याने गणेश विसर्जन मिरवणूकीत अनेक मंडळी ढोलताशा, दोन स्टेरीओ बॉक्स, कर्णे आदींना प्राधान्य दिले. या वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरत अनेकांनी नृत्याचा आनंद लुटला.
गणेश मंडळांची संख्या लक्षात घेता महापालिकेने चार तराफे व दोन रबरी बोटींची सोय केली होती. तर मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी काही मंडळांनी मोठे क्रेनही भाड्याने आणले होते.
शिवाजी पेठ विभागीय कार्यालयातील १०० हून अधिक महापालिका कर्मचारी ३० तासाहून अधिक काळ दोन प्रहरीत कार्यरत होते. दोन्ही खणींच्या कडेने नागरीकांच्या सुरक्षितेकरीता महापालिकेने संरक्षक लोखंडी जाळ्या लावल्या होता. तर अग्निशमन दलाचे एक स्टेशन अधिकारी, एक तांडेल ८ कर्मचारी कार्यरत होते.
२१ फु टी गणेशमूर्ती मंडळे
प्रकाश बिल्डर मित्र मंडळ (शाहूपुरी), न्यू सम्राट चौक तरुण मंडळ, नरसिंह मित्र मंडळ , पुलगल्ली तालीम मंडळ, बजापराव माजगांवकर तालीम मंडळ, भगतसिंग तरुण मंडळ,
१८ फुटी गणेश मंडळे
एक दंताय तरुण मंडळ (जवाहर नगर), दिलबहार तालीम मंडळ, राजर्षी शाहू फ्रेंड सर्कल,
१५ फुटी गणेश मंडळे
विश्वशांती तरुण मंडळ (माळी गल्ली), नरसोबा तरुण मंडळ, न्यू चॅलेज मित्र मंडळ, विक्रम स्पोर्टस, स्वाभिमानी मित्र मंडळ, गणेश तरुण मंडळ, संतोष कॉलनी (सानेगुरुजी), जुना पंचमुखी गणेश तरुण मंडळ (शाहूपुरी), छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, डी.आण्णा मंडळ (विक्रमनगर), न्यू उद्यमनगर फ्रेंडस सर्कल यांचा समावेश होता.
‘खारीचा वाटा ’
पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल, स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी यांना ‘ खारीचा वाटा ’ या संस्थेतर्फे पाच हजारांहून अधिक बिस्कीटांचे वाटप केले. या संस्थेचे अमेय गोखले, गौतम पलुसकर, चैतन्य पोटे, श्रेयस पाटील, सुधीर कुमार पाटील हे मिरवणूकीत साडेचार वाजल्यापासून रात्री दोन पर्यंत प्रत्येक कर्मचाºयाला भेटून बिस्कीट देत होते.
गेल्या सात वर्षांत इराणी खण येथे विसर्जित करण्यात आलेल्या ३ ते २१ फूट मूर्तींचा आकडा असा,
वर्ष गणेश मंडळांची संख्या
२०१० २६०
२०११ २६१
२०१२ २८५
२०१३ ३६६
२०१४ २५०
२०१५ ३५२
२०१६ २६२