‘आयआरबी’ परवडली... बाजार समिती नको !
By Admin | Published: January 8, 2015 12:32 AM2015-01-08T00:32:15+5:302015-01-08T00:38:27+5:30
शेतकरी आक्रमक : रस्तेच नाहीत, प्रवेश कर कसला घेता?
कोल्हापूर : बाजार समितीत प्रवेश केल्यानंतर रस्ता शोधतच अडत दुकानापर्यंत जावे लागते. खाचखळग्यांनी वाहनांचे नुकसान होत असताना प्रवेश कर कसला घेता? अशी विचारणा करीत ‘प्रवेश कर बंद करा अन्यथा आंदोलन उभारावे लागेल,’ असा इशारा आज, बुधवारी शेतकऱ्यांना समिती प्रशासनाला दिला. कराची रक्कम पाहता ‘आयआरबी’ कंपनीचा टोल परवडला; पण बाजार समितीचा कर नको, असे म्हणण्याची वेळ आल्याच्याही संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी नोंदविल्या.
पूर्वी बैलगाडीसाठी वर्षाला नाममात्र प्रवेश शुल्क घेतले जात असे. आता बैलगाड्या बंद झाल्याने शुल्क वाढविण्यात आले आहे. अशासकीय मंडळाच्या कार्यकाळात त्यांनी प्रवेश शुल्क वाढीचा निर्णय घेतला. ट्रकसाठी वीस, तर टेम्पो व रिक्षासाठी पंधरा रुपये प्रवेश शुल्क आकारले जात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. आज गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासकांकडे तक्रार करीत शुल्क रद्द करण्याची मागणी लावून धरली.
व्यावसायिक हेतूने वाहने चालविली जातात, त्यांच्याकडून कर घेतला पाहिजे. तुम्हाला सुविधा देण्यासाठी कर घ्यावाच लागेल, तशी उपविधीमध्ये तरतूद असल्याने प्रशासक रंजन लाखे यांनी सांगितले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. खराब रस्ते असताना ‘आयआरबी’च्या टोल पेक्षाही तुमचा कर जास्त कसा? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत बाजीराव पाटील यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले.
‘सांगली’ समितीत विनाशुल्क प्रवेश
सांगली बाजार समितीत शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. मग कोल्हापूरची बाजार समितीच ते का आकारते? सुविधांच्या नावाखाली पैसे उकळता; मग आतापर्यंत कोणत्या सुविधा तुम्ही दिल्या? असा सवाल शेतकरी करीत आहेत.
उपविधीला आव्हान द्या; मग बघू
बाजार समितीच्या उपविधीमधील तरतुदीप्रमाणे ही करवसुली सुरू आहे. तुम्हाला कर नको असेल तर उपविधीला आव्हान द्या. पणन संचालकांनी सांगितले तर रद्द करू, असे प्रशासक रंजन लाखे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
अशी होते वसुली -
रिक्षा - १० रुपये
टेम्पो - १५ रुपये
ट्रक - २० रुपये