वर्चस्ववादातून इरफान मुल्लाचा खून; चौघांना अटक
By admin | Published: September 28, 2014 12:47 AM2014-09-28T00:47:27+5:302014-09-28T00:51:34+5:30
आरोपींना हद्दपार करण्याची मागणी : संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
कोल्हापूर : दोन गटांमधील वर्चस्ववादातून इरफान आदम मुल्ला (वय २६, रा. साळोखे पार्क) याचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी चौघा संशयितांना आज, शनिवारी अटक केली. पुंडलिक साताप्पा बांदिवडेकर (वय ६६), सनीराम साळे (२४), स्वरूप विजय दळवी (२७), उत्तम तानाजी पाटील (२७, सर्व रा. साळोखे पार्क) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, गुंड प्रवृत्तीच्या बांदिवडेकर कुटुंबीयांना परिसरातून कायमचे हद्दपार करावे, या मागणीसाठी साळोखे पार्क येथील दोनशे महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले.
साळोखे पार्क येथील दोन मंडळांत झालेल्या वादामधून घरामध्ये घुसून इरफान मुल्ला याचा खून करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर संशयित हल्लेखोर पसार झाले होते. मृत मुल्ला याचा भाऊ इर्शाद व नातेवाइकांनी विक्रम पुंडलिक बांदिवडेकर, विश्वास पुंडलिक बांदिवडेकर, सनी साळे, स्वरूप दळवी, उत्तम पाटील, मंजुनाथ गंगापोळ, कुमार गंगापोळ या सातजणांवर संशय व्यक्त केला.
त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांचे अन्य साथीदार फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी दिली. सनी साळे हा ‘आरसी गँग’चा सदस्य असून, त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असल्याचे समजते.
दरम्यान, गुंड बांदिवडेकर बंंधू बाहेरील गुंड आणून दहशत माजवीत आहेत.
दादागिरीच्या जोरावर त्यांनी सामान्य लोकांचे जीवन हैराण करून टाकले आहे. या गुंडांना परिसरातून कायमचे हद्दपार करावे, देवीचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी संतप्त महिलांनी पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याकडे केली. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिल्यानंतर महिला माघारी परतल्या.
मोर्चामध्ये राजश्री सोळंकी, मेहबूब तासेवाले, कमल गुंजीकर, शकुंतला सुतार, विजया बोडके, ज्योती माने, दीपाली माने यांच्यासह महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)