जलसिंचन योजनांमधील भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही
By admin | Published: April 17, 2015 10:27 PM2015-04-17T22:27:02+5:302015-04-18T00:05:29+5:30
गिरीश महाजन : कर्जरोखे काढून रखडलेल्या योजना पूर्ण करणार
मिरज : सिंचन योजनांसाठी कर्जरोखे काढून २५ हजार कोटींचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यापुढे नवीन प्रकल्प सुरू न करता अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करू, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी भोसे (ता. मिरज) येथे शेतकरी मेळाव्यात केली. यापूर्वी जलसिंचन योजनांत हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
म्हैसाळ योजनेंतर्गत डोंगरवाडी उपसा योजनेचे उद्घाटन महाजन यांनी केले. त्यानंतर भोसे येथील शेतकरी मेळाव्यात त्यांनी आघाडी शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जलसिंचनात भ्रष्टाचार होऊन योजना रखडल्याचा आरोप केला.
ते म्हणाले की, पंधरा वर्षांपूर्वी युती शासनाला पुन्हा संधी मिळाली असती तर म्हैसाळ योजना पूर्ण झाली असती. आता म्हैसाळची अपूर्ण कामे दोन वर्षात पूर्ण करू. आघाडी शासनाच्या अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी ७० हजार कोटी लागणार आहेत. मात्र, जलसंपदा विभागाकडे केवळ आठ हजार कोटींचा निधी उपलब्ध असल्याने या रकमेत पुढील ५० वर्षे कामे पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे यापुढे सिंचनाचे नवीन प्रकल्प सुरू न करता जुने व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करावे लागणार आहे. कर्जे घेऊन व कर्जरोख्यांव्दारे २५ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून चार महिन्यात योजनांची कामे सुरू करण्यात येणार आहेत.
विजय शिवतारे म्हणाले की, टेंभू, म्हैसाळ या सिंचन योजनांचे श्रेय युतीचे आहे. मात्र, पतंगराव कदम त्याचे खोटे श्रेय घेऊन निवडून येतात. दुष्काळ निर्मूलनासाठी शासनाने नेमलेल्या सहा समित्यांनी अवर्षणप्रवण भागात सिंचन व्यवस्था व जलसंधारणाची कामे करावीत अशी शिफारस केली आहे.
याप्रसंगी आ. शिवाजीराव नाईक, आ. सुधीर गाडगीळ, आ. उल्हास पाटील, आ. अनिल बाबर, जयसिंग शेडगे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, डॉ. दिलीप येळगावकर, गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीवाले टांग मारतात : शिवतारे
विजय शिवतारे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यात पतंगराव कदम यांच्यासारखे निवडून येतात. यापुढे जयंतराव पाटीलही घरी बसले पाहिजेत. यापुढे त्यांचे काही चालणार नाही. त्यांचे पैसे किंवा काय घ्यायचे ते घ्या; मात्र त्यांना निवडून देऊ नका. मी पवारांच्या बालेकिल्ल्यात दारू किंवा पैशाचे वाटप न करता निवडून येतो, काँग्रेस-राष्ट्रवादी नेते फायद्यासाठी सेना-भाजपकडे येतात आणि परत टांग मारतात.
ठिबकचा वापर सक्तीचा करावा लागेल
पाण्याची उपलब्धता कमी असल्याने पाणी वापर संस्थांमार्फत पाण्याचा वापर व नियोजन आवश्यक आहे. ठिबक योजनेद्वारे शेतीसाठी पाण्याचा वापर सक्तीचा करावा लागणार आहे, असेही महाजन यांनी सांगितले.