Kolhapur News: ‘सद्भावना रॅली’हे राजकीय षडयंत्र आहे का?, सकल हिंदू समाजाच्यावतीने सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:44 PM2023-06-20T12:44:35+5:302023-06-20T12:44:47+5:30
एकीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ‘सद्भावना रॅली’ का काढली जात आहे?
कोल्हापूर : एकीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ‘सद्भावना रॅली’ का काढली जात आहे? हे नाटक फक्त हिंदूंवर अन्याय झाल्यानंतर हिंदू रस्त्यावर उतरल्यावरच कसे सुचते आणि ही रॅली म्हणजे राजकीय षडयंत्र आहे का? असा सवाल हिंदुत्ववादी पंचवीस संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे.
कसबा बावडा येथे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीला पाळणा सजवणाऱ्या हिंदू महिलांना मारहाण झाली, हेर्ले येथे शिवजयंतीचे पोस्टर फाडले, बिहारमधील ६९ मुलांना आजऱ्याच्या मदरशात शिक्षण देण्यात येणार होते, ‘इंडिका’ गाडीवर ‘शरीयानुसार अजून ६ लग्नं बाकी आहेत’, असे लिहिलेली गाडी हिंदूंनी पकडून दिली.
एका मौलवीच्या मुलाने एकटी आई, दोन मुली, एक वयस्कर आजी अशा परिवाराला हेरले. धमक्या दिल्या. राजकीय दबाव आणला आणि १६ वर्षांच्या हिंदू मुलीला फूस लावून तिचे धर्मांतर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी ‘औरंगजेब सगळ्यांचा बाप’ असे स्टेटस ठेवले. या सगळ्या घटना घडत असताना तथाकथित पुरोगामी कुठे होते? असा सवाल विचारण्यात आला आहे.
जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतात, तेव्हा पुरोगामी गप्प का असतात? खरा हिंदुत्ववाद आतापर्यंत जपला म्हणूनच जिल्हा शांत असतो. परंतु, या रॅलीच्या निमित्ताने जर हिंदूंना दंगलखोर ठरवले जाणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. शांतता राहायची असेल तर या सद्भावना रॅलीला परवानगी देऊ नये, असेही नमूद करण्यात आले आहे.