इचलकरंजी शहर काय पाकिस्तानमध्ये आहे का? खासदार धैर्यशील माने यांची संतप्त विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 01:59 PM2023-08-02T13:59:14+5:302023-08-02T14:00:24+5:30
'कोल्हापूर शहराला थेट पाइपलाइनने पाणी देताना कुणीच विरोध केला नाही'
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेट पाइपलाइनने पाणी देताना कुणीच विरोध केला नाही आणि आता इचलकरंजीला पाणी देताना विरोध होत असेल तर तो चुकीचा आहे. इचलकरंजी हेसुद्धा महाराष्ट्रातीलच एक प्रमुख शहर असून ते काय पाकिस्तानात आहे काय, अशी संतप्त विचारणा खासदार धैर्यशील माने यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली.
खासदार माने म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे एकट्या कागलचे नव्हे तर राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी इचलकरंजीच्या पाणीप्रश्र्नांकडे संवेदनशीलतेने पाहावे. शासनाने जेव्हा १६० कोटी रुपयांची योजनेस तांत्रिक मंजुरी दिली तेव्हा अन्य कोणत्याच शहर, प्रदेशाला पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता घेतलेली असते.
आहे ती व्यवस्था अडचणीत आणून शासन कधीच दुसऱ्या व्यवस्थेला परवानगी देत नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी मोठ्या शहरांना पाणी देणार नाही, अशी भूमिका घेतली तरी ती शहरे तहानलेली राहतील. या शहरातील लोकही याच गावांतून आलेले आहेत. त्यामुळे कागलच्या जनतेची समजूत काढण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.