इस्लामपूरचा प्रतीक कुंभार निघाला विमानाने दिल्लीला
By Admin | Published: June 24, 2015 12:08 AM2015-06-24T00:08:16+5:302015-06-24T00:43:00+5:30
लोकमत’ संस्कारांचे मोती स्पर्धेतून निवड
इस्लामपूर : ‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती : ग्रीन किडस्’ स्पर्धेतून ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ या मानाच्या हवाई सफरीसाठी इस्लामपूर हायस्कूलच्या प्रतीक कैलासनाथ कुंभार या सहावीतील विद्यार्थ्याची निवड झाली. सांगली जिल्ह्यातून निवड झालेला प्रतीक हा एकमेव विद्यार्थी आहे. या निवडीने शाळेतील गुरुजन आणि विद्यार्थ्यांनी मंगळवारी त्याचा जल्लोषात सत्कार केला.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे १ जुलै ते ११ आॅक्टोबर २०१४ दरम्यान ‘संस्कारांचे मोती : ग्रीन किडस्’ ही सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रतीकची हवाई सफरीसाठी निवड झाली. निवडीचे वृत्त त्याच्या कुटुंबियांना समजताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रतीक विमानाने प्रवास करणार, ही बातमी त्यांच्यासाठी आनंद व अभिमानाची ठरली. मंगळवारी इस्लामपूर हायस्कूलमध्ये ‘लोकमत’ परिवारातर्फे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एस. के. कुलकर्णी, मुख्याध्यापक ए. आर. खटावकर यांच्याहस्ते प्रतीकचा सत्कार केला.
यावेळी खटावकर म्हणाले की, शाळेचे नाव देशाच्या राजधानीत पोहोचवून प्रतीक मान्यवरांना ‘अमृतकुंभ’ हा ग्रंथ भेट देईल. (वार्ताहर)
आनंद अन् अभिमानही...
मूळचे वेजेगाव (ता. खानापूर) येथील प्रतीकचे वडील कैलासनाथ कुंभार एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागात सेवेत आहेत. प्रतीकच्या हवाई सफरीचा आनंद व अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले, तर आई सौ. छाया कुंभार म्हणाल्या की, प्रतीक आणि प्रथमेश ही जुळी भावंडे आहेत. प्रतीकच्या निवडीनंतर त्यानेही हवाई सफरीचा हट्ट धरला. यापूर्वी मुलगी पल्लवीनेही ‘लोकमत’च्या संस्काराच्या मोतीचे पारितोषिक पटकावले आहे.