इस्लामपूरच्या नगराध्यक्षांनी पैसे वाटल्याची तक्रार
By admin | Published: February 21, 2017 01:31 AM2017-02-21T01:31:43+5:302017-02-21T01:31:43+5:30
शिगावमधील घटना : खोलीत कोंडले; ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय
बागणी : बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातील रयत विकास आघाडीचे उमेदवार सागर खोत यांच्यासाठी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सोमवारी रात्री शिगाव (ता. वाळवा) येथे मतदारांना पैसे वाटल्याची तक्रार ग्रामस्थ व स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. पाटील यांना पैसे वाटताना ग्रामस्थांनी पकडून खोलीतही कोंडल्याची चर्चा आहे.
या घटनेचे वृत्त समजताच माजी मंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार विश्वासराव पाटील रात्री उशिरा शिगावमध्ये दाखल झाले. तोपर्यंत निशिकांत पाटील पोलिस बंदोबस्तात तेथून निघून गेले होते. जोपर्यंत निशिकांत पाटील यांना अटक होत नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
शिगाव येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत जिल्हा परिषदेच्या बागणी गटातून निवडणूक लढवित आहेत. यासाठी निशिकांत पाटील सोमवारी रात्री पंचवीस लाख रूपये घेऊन शिगावमध्ये आले होते. ही रक्कम जनावरांच्या एका गोठ्यात बसून ते मतदारांना वाटप करीत होते. कोणाला किती पैसे दिले,
याबाबत प्रत्येक मतदाराच्या नावाची नोंद करण्यासाठी एक कार्यकर्ताही वही घेऊन जवळ बसविला होता. ग्रामस्थ व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार समजताच ते तातडीने तेथे दाखल झाले व त्यांनी निशिकांत पाटील यांना पकडून एका खोलीत कोंडले. आष्टा पोलिसही तेथे दाखल झाले. त्यांनी निशिकांत पाटील यांना ताब्यात घेतले. पैशाची बॅगही जप्त केली. ‘पाटील यांना पोलिस ठाण्यात नेतो’, असे सांगून पोलिस तेथून निघून गेले. मात्र प्रत्यक्षात काही अंतरावर गेल्यानंतर पाटील यांना पैशासह पोलिसांनी सोडून दिले आहे, असा आरोपही ग्रामस्थांनी केला.
या घटनेचे वृत्त समजताच माजी मंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे कार्यकर्त्यांसह शिगावमध्ये रात्री उशिरा दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांकडून याची माहिती घेतली. त्यावेळी ग्रामस्थांनी निशिकांत पाटील हे २५ ते ३० लाखांची रोकड घेऊन आले होते, त्यांच्यासोबत दोन आलिशान गाड्याही होत्या. पैसे वाटपावेळी शंभर-दीडशे कार्यकर्ते बसून होते. हा प्रकार समजताच आम्ही विरोध केला. पोलिस आले; त्यांना पैसे वाटल्याचे सर्व पुरावे दिले, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिस उपनिरीक्षक एम. जी. नदाफ यांनी त्यांना मदतच केली, अशी माहिती दिली. निशिकांत पाटील व सागर खोत यांना अटक करावी; अन्यथा मंगळवारी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकला जाईल, असा निर्णय घेतला असल्याचेही मधुकर पाटील, स्वरूपराव पाटील, विकास पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पोलिसांचा निषेध...
पैसे वाटपाच्या प्रकारानंतर शिगावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पैेसे वाटताना पकडून देऊनही, कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिसांचा ग्रामस्थांनी निषेध केला.
-------------
मी शिगावला पाहुण्यांच्या घरी बसलो होतो. आमचे चहापाणी सुरू होते. परंतु विरोधकांनी याचा वेगळाच अर्थ काढून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय द्वेषातून विरोधकांनी केलेला हा बनाव आहे. घडलेला प्रकार निंदनीय असून मी याचा निषेध करतो.
- निशिकांत पाटील,
नगराध्यक्ष, इस्लामपूर
-------------
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांनी हा बनाव केला आहे. केवळ त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी या घटनेचा आधार घेतला आहे. निशिकांत पाटील यांनी अशी कुठलीही गोष्ट केलेली नाही. माझा मुलगा निवडणुकीत उतरला आहे, याचा पोटशूळ उठल्यामुळे जयंत पाटील यांचे हे प्रयोग चालू आहेत.
- सदाभाऊ खोत,
कृषी राज्यमंत्री
शिगावात जयंत पाटील यांचा ठिय्या
हा प्रकार समजताच आमदार जयंत पाटील शिगावात दाखल झाले. अडीचशेहून अधिक कार्यकर्त्यांसह तेथे भर चौकात त्यांनी ठाण मांडले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहन ताफ्यातील पोलिस निरीक्षक एम. जी. नदाफ यांनी निशिकांत पाटील यांना पैशासह सुरक्षितपणे बाहेर काढून नेले. पोलिसच त्यांचे संरक्षण करीत असतील तर, येथील निवडणूक स्थगित करून पुन्हा घ्यावी, नदाफ यांना आमच्यासमोर हजर करून सत्य स्थिती सांगायला लावावी, तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह पैसेवाटप करण्यात सहभागी असलेल्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी जिल्हा पोलिस उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्याकडे केली. याशिवाय येथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. रात्री पावणेबारानंतरही त्यांचे हे आंदोलन सुरूच होते.