धैर्यशील माने ही भाजपची चॉईस नाही का? राजू शेट्टींची विचारणा; अडचणीत असल्यानेच स्वाभिमानी, रासपची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 11:40 AM2023-03-08T11:40:50+5:302023-03-08T11:42:03+5:30
आता ज्यांना सोबत घेतले आहे, त्यांना घेऊन दोन्ही निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे भाजपच्या लक्षात आल्यानेच त्यांना राजू शेट्टी, महादेव जानकर यांची नावे आठवण झाली
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी उमेदवार असताना भाजप नेते उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मला महायुतीसोबत या म्हणत आहेत, याचाच अर्थ खासदार धैर्यशील माने हे आता निवडून येऊ शकत नाहीत, अशी भाजपची खात्री झाली आहे. म्हणूनच त्यांनी पर्यायी उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. खासदार माने ही भाजपची चॉईस नाही, असाही मंत्री पाटील यांच्या विधानाचा स्पष्ट अर्थ होत असल्याचा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. मंत्री पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात आमचा शेट्टी यांच्याशी संवाद आहे व ते आमच्यासोबत येतील, असा विश्वास व्यक्त केला होता.
शेट्टी म्हणाले, राजू शेट्टी यांची किंवा त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आता अचानक भाजप नेते व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आठवण व्हावी, ही तर लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अडचणीत असल्याची प्रत्यक्ष कबुलीच आहे. शिवसेनेतून गद्दारी केलेल्या लोकांचे काय होते हे महाराष्ट्राने पाहिले, अनुभवले आहे. खेड (जि. रत्नागिरी) येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता महाराष्ट्रात काय घडणार याचीच चुणूक दिसत आहे. त्याची चाहूल लागल्यानेच मंत्री पाटील किंवा भाजपला आता मित्रपक्षांची आठवण झाली आहे.. अन्यथा मागच्या चार वर्षात भाजपवाल्यांच्या तोंडात रासप, शेतकरी संघटना हे शब्दही महाराष्ट्राला ऐकायला मिळाले नाहीत. आता ज्यांना सोबत घेतले आहे, त्यांना घेऊन दोन्ही निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे भाजपच्या लक्षात आल्यानेच त्यांना राजू शेट्टी, महादेव जानकर यांची नावे आठवण झाली आहे. एका अर्थाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचेच हे लक्षण आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही एकला चलो रे... ही भूमिका घेऊनच मैदानात उतरू.. आमचं ठरलं आहे. त्यात बदल नाहीच. महायुतीही नको व महाविकास आघाडीही नको. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा, प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा असेल तरच मला निवडून द्या, अशीच भूमिका घेऊन लोकांकडे जायचे निश्चित केले आहे, असे माजी खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, भाजपची संगत सोडल्यावर भाजपने संघटना संपवण्याचा प्रयत्न केला. खोत यांच्यासारखे बांडगूळ आमच्याविरोधात उभे करून संघटना जातीयवादी असल्याचे आरोप केले. कार्यकर्त्यांना जेवढा त्रास देता येईल तेवढा दिला; परंतु तरीही आम्ही त्यांना पुरून उरलो.
किंमत चुकती केली..
गेल्या लोकसभेच्या आधीच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला अंगावर घेतले. त्याची किंमत आम्ही चुकती केली व त्याचा आम्हाला किंचितही पश्चात्ताप नाही. कारण सत्तेचा मोह कधीच नव्हता. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्या वाट्याला जाण्याचा प्रश्नच येत नाही.. पैरा एकदाच होतो. त्यात फसवणूक झाली की शेतकरी स्वत:च बैलाची जुपी करतो.. तो कुणासाठी थांबत नाही..