corona virus-‘आयसोलेशन’ कोरोना संशयितांसाठीच राखीव, मनपाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 03:17 PM2020-03-17T15:17:17+5:302020-03-17T15:21:00+5:30
कोरोना विषाणूशी सामना करण्याकरिता महानगरपालिकेची यंत्रणा सक्रिय झाली असून आरोग्य विभागाने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार यापुढे आयसोलेशन हॉस्पिटल केवळ कोरोना संशयितांसाठी राखीव ठेवण्यात आले. संशयित रुग्णांच्या शोधाकरिता शहरात तीन ठिकाणी स्क्रीनिंग करण्यात येईल, तसेच घरोघरी जाऊन शोध मोहीम तसेच प्रबोधन करण्याकरिता अकरा पथके स्थापन करण्यात आली.
कोल्हापूर : कोरोना विषाणूशी सामना करण्याकरिता महानगरपालिकेची यंत्रणा सक्रिय झाली असून आरोग्य विभागाने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार यापुढे आयसोलेशन हॉस्पिटल केवळ कोरोना संशयितांसाठी राखीव ठेवण्यात आले. संशयित रुग्णांच्या शोधाकरिता शहरात तीन ठिकाणी स्क्रीनिंग करण्यात येईल, तसेच घरोघरी जाऊन शोध मोहीम तसेच प्रबोधन करण्याकरिता अकरा पथके स्थापन करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये केवळ दहा खाटा कोरोना संशयितांसाठी उपलब्ध करून ठेवा असे सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारी या रुग्णालयातील कावीळ व गॅस्ट्रोचे सर्व रुग्ण सावित्रीबाई फुले रुग्णालयात स्थलांतर करून या ठिकाणी केवळ कोरोना संशयित रुग्णांनाच ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली.
तेथे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला असून, चोवीस तास सेवा देण्यात येईल. त्याच ठिकाणी एक विशेष कक्षही सुरू करण्यात आला आहे. आयसोलेशन हॉस्पिटलला आवश्यक मास्क, सलाईन, प्राथमिक औषधांचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. एक रूम खास रुग्णांच्या नातेवाईकांना कौन्सिलिंग करण्याकरिता राखीव ठेवण्यात आली आहे.
शिरोली नाका, शाहू नाका, शिये नाका या तीन ठिकाणी तपासणी पथके ठेवण्यात येत आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या या तीन महत्त्वाच्या रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात ही पथके शहरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी, विचारपूस (स्क्रीनिंग) करणार आहेत.
शहरात येणाऱ्या प्रवाशांपैकी कोणाला कोरोनासदृश लक्षणे आढळून आली तर त्याचे नाव, पत्ता, फोन नंबर, तो कोणाच्या संपर्कात आला होता, याची संपूर्ण माहिती लिहून घेतली जाईल. जर संशय अधिकच असेल तर त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात नेऊन दाखल केले जाणार आहे.
शहरात महापालिकेची अकरा नागरी आरोग्य सुविधा केंद्रे असून, त्याअंतर्गत अकरा पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायचे आहे. प्रत्येक घरात सर्दी, खोकला, ताप, घशाचे विकार असलेला कोणी रुग्ण आहे का, याची चौकशी केली जाणार आहे. त्याच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत.
जर असा आढळलाच तर त्यावर प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. या पथकात वैद्यकीय अधिकारी, नर्स, कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ही पथके कोरोना विषाणूबाबत जनजागृती करतील. माहिती पत्रके वाटतील.
डॉ. दिलीप पाटील पुन्हा रुजू
चार दिवसांपूर्वी आरोग्याधिकारीपदाचा राजीनामा दिलेले डॉ. दिलीप पाटील पुन्हा रुजू झाले. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना कामावर रुजू होण्यासाठी विनंती केली होती. डॉ. पाटील हजर झाल्या झाल्या तीन निर्णय घेतले आणि यंत्रणाही कामाला लावली.
माणुसकीच्या भावनेने सेवा द्या
कोरोनाचे संकट मोठे असल्याने यदाकदाचित आवश्यकता लागलीच तर शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टर्सनी महापालिकेकडे दिवसातील काही तास माणुसकीच्या भावनेने सेवा द्यावी, अशी विनंती करणारे पत्र आपण सर्व रुग्णालयातील डॉक्टर्सना पाठवित आहे. तसेच वेगवेगळ्या असोसिएशनच्या अध्यक्ष व सचिवांनाही पत्र पाठवून त्यांना या कामात योगदान देण्याचे आवाहन करणार असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.
शहरातील बागा बंद
‘कोरोना’चा संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जलतरण तलाव, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल बंद ठेवले आहेत. सोमवारी शहरातील सर्व बागाही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.