संगणक खरेदीचा विषय आता विभागीय आयुक्तांसमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:06+5:302021-03-20T04:22:06+5:30
कोल्हापूर : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या निधीतून केलेल्या संगणक खरेदीबाबत स्थायी समितीने प्रश्न उपस्थित केले असून, त्यांच्या भावना विभागीय ...
कोल्हापूर : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या निधीतून केलेल्या संगणक खरेदीबाबत स्थायी समितीने प्रश्न उपस्थित केले असून, त्यांच्या भावना विभागीय आयुक्तांना कळविण्यात येणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी माणगाव (ता. हातकणंगले) येथे झालेल्या सभेत आपली भूमिका स्पष्ट केली. सभेतील बहुतांश वेळ हा कोविड काळातील खरेदी आणि संगणक खरेदीवरील चर्चेतच गेला; परंतु त्यातून निष्पण्ण काही झाले नाही. अध्यक्षस्थानी बजरंग पाटील होते.
माणगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या या सभेत सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचे स्वागत सरपंच राजू मगदूम आणि जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम यांनी केले. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी संगणक खरेदीचा विषय उपस्थित केला. चार संगणकांना एक प्रिंटर चालत असताना जादा प्रिंटर घेण्यात आले? यामध्ये चांगला हेतू होता असे दिसत नाही, असे निंबाळकर म्हणाले. औषध निर्माता युवराज बिल्ले यांच्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. अमन मित्तल यांनी जाता-जाता त्यांच्या वेतनवाढी पूर्ववत केल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला. तेव्हा बिल्ले यांचे नाव कशाला घेता, त्यामागे कोण आहे ते बघा. बिल्ले औषधे मागवत होते आणि वाटत होते असे अरुण इंगवले म्हणाले.
उदगाव पाणी योजनेसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता उकरण्यासाठी खात्याने एक कोटी रुपयांचा दर आकारला आहे; तर योजनेच्या अंदाजपत्रकात यासाठी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. हे असे कसे करता अशी विचारणा समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांनी केली. स्थायी समितीमध्ये आम्ही सर्व विषय मंजूर करतो. त्यामुळे स्थायीच्या सदस्यांना झुकते माप द्या, अशी मागणी युवराज पाटील यांनी केली. यावर अरुण इंगवले म्हणाले, एक-दोन विषय आम्ही थांबवले की मग तुम्हांला कळ येणार असेल तर तसं सांगा. यावेळी सभापती पद्माराणी पाटील यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. चर्चेत जयवंतराव शिंपी, राहुल पाटील, कल्लाप्पा भोगण यांनी भाग घेतला. सर्व सदस्यांनी माणगाव परिषदेच्या ठिकाणी भेट देऊन तेथील वास्तूंची पाहणी केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
चौकट
मित्तल यांच्या कारभाराची चौकशी करा
याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या गेल्या वर्षभरातील कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी राजवर्धन निंबाळकर यांनी केली. त्यांनी जाता-जाता कोणाही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कारभार केल्याचेही ते म्हणाले.
चौकट
माणगावसाठी निधीची मागणी
स्थायी समितीची सभा ऐतिहासिक अशा माणगावमध्ये होत आहे. तेव्हा माणगावसाठी काहीतरी निधी जाहीर करा, अशी मागणी निंबाळकर यांनी केली. तेव्हा अध्यक्ष पाटील आणि अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांनी बैठकीत ठरवून सांगता असे स्पष्ट केले. मात्र याच ठिकाणी निधीची घोषणा करणे अपेक्षित होते.
फोटो १९०३२०२१-कोल-झेडपी०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी शुक्रवारी माणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.