सभागृह नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
By admin | Published: September 20, 2015 10:41 PM2015-09-20T22:41:18+5:302015-09-21T00:07:53+5:30
वाळवा पंचायत समिती : वसंतदादांच्या प्रेमापोटी काँग्रेससह विरोधी पक्ष एकवटणार
अशोक पाटील --इस्लामपूर --माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या बगलबच्च्यांनी पक्षाची ताकद आणि आर्थिक जोरावर वाळवा पंचायत समितीच्या नवीन सभागृहाला राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा घाट घातला आहे, तर जुन्या सभागृहाला असलेले वसंतदादा पाटील यांचे नाव गायब करण्याचा कटही राष्ट्रवादीने आखला आहे. त्याविरोधात काँग्रेससह सर्वपक्षीय विरोधक एकत्र येऊन लढा देण्याचा इशारा काँग्रेसचे पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.
पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीची हुकूमशाही सुरू आहे. ताकदीच्या जिवावर स्वत:ची मालमत्ता समजून नामांतराचा ठराव करणाऱ्यांविरोधात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, काँग्रेसचे नानासाहेब महाडिक, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांच्यासह हुतात्मा गटाचे युवा नेते, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी एकत्र येऊन सभागृहाच्या नामांतराला विरोध करणार आहेत.
मुळातच तालुका पंचायत समितीची मालमत्ता ही जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. नामांतरासाठी शासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच तसा ठरावही सभागृहाच्या बैठकीत होणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव बेकायदेशीर आहे. नवीन प्रशासकीय कार्यालयात अधिकारी व सदस्यांसाठी वातानुकूलित खोल्या बांधण्यात आल्या आहेत, तर विरोधकांसाठी कसलीही व्यवस्था नाही. सर्वसामान्य जनतेसाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली नाही. सध्या पावसाअभावी पिकांची परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तालुक्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. याचा कसलाही विचार न करता सत्ताधारी राष्ट्रवादीला सभागृहाच्या नामांतराचाच प्रश्न महत्त्वाचा वाटत आहे, असाही आरोप पाटील यांनी केला आहे.
एकंदरीत नामांतराचा वाद चांगलाच पेटणार असून, राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नामांतराचा हा मुद्दा येथील राजकीय पटावर आता चांगलाच रंगणार आहे.
शिष्टाचार गेला, राजकारण आले...
वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील तत्कालीन वादाची, संघर्षाची छाया त्यांच्या पुढील पिढीतही कायम राहिली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतही महापौर कार्यालयात यापूर्वी राजारामबापू पाटील यांची प्रतिमा लावण्यात आली होती. गत निवडणुकीत सत्ताबदल झाला. पण गेल्या दीड वर्षात महापौर कार्यालयातील प्रतिमा बदलल्या नव्हत्या. नुकतेच महापौर कार्यालयाचे नूतनीकरण झाले. त्यानंतर राजारामबापूंच्या प्रतिमेची जागा आता विष्णुअण्णा पाटील यांच्या प्रतिमेने घेतली आहे.
वसंतदादा पाटील हे जिल्ह्याचे भाग्यविधाते आहेत. अशा या थोर नेत्याचे सभागृहाला दिलेले नाव बदलणे हे चुकीचे आहे. राष्ट्रवादीने नाव बदलण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात काँग्रेसचे नेते एकत्र येऊन आंदोलन करतील.
- जितेंद्र पाटील,
माजी जि. प. सदस्य, बोरगाव.
पंचायत समिती ही शासकीय स्वायत्तता आहे. याठिकाणी नेत्यांचे नाव देणे योग्य होणार नाही. सत्ता बदलली की नाव बदलण्याचा पायंडा चुकीचा आहे. त्यामुळे शासकीय इमारतीला नावे देतानाच विचार होणे गरजेचे आहे.
- राहुल महाडिक,
माजी जि. प. सदस्य, येलूर.