सत्तासंघर्षाचा वाद विकोपाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:59 PM2018-07-08T23:59:15+5:302018-07-09T00:00:04+5:30
सोळांकूर : विधानसभेसाठी राष्टÑवादी पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील इच्छुक आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी पक्ष पातळीवर दोघांनी परस्पर रणनिती आखली आहे. तशी स्वतंत्र प्रचारयंत्रणा राबत असून सत्तासंघर्षाचा वाद विकोपाला गेला आहे. याची कल्पना आमदार हसन मुश्रीफ यांना असताना त्यांनी कसबा वाळवे येथील कार्यक्रमात के. पी. पाटील यांच्या उमेदवारीचे समर्थन केल्याने ए. वाय. यांच्या समर्थकांमध्ये याचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत.
युवा वर्गात ए. वाय. यांची क्रेझ निर्माण झाली असून, सोशल मिडियाच्या माध्यमातून आगामी विधानसभा ए. वाय. लढणार म्हणजे लढवणार, उद्याचे भावी आमदार ओनली ए. वाय. आता माघार नाही. अशा आशयाच्या प्रतिक्रियांना ऊत आला आहे.
नुकत्याच झालेल्या भोगावती साखर कारखान्याच्या वर्चस्वावरून दोघात मतभेद झाले. भोगावतीचे माजी अध्यक्ष व के. पी. यांचे जावई धैर्यशील पाटील-कौलवकर यांना तालुक्यात पुढे जाण्याच्या हालचाली झाल्या. तसेच पॅनेलची रचना करताना आपणास विचारात न घेतल्याचे व निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने कारण पुढे करत ए. वाय पाटील यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला. राष्टÑवादीचा पराभवाचा फटका बसला ही सल के. पी. पाटील व धैर्यशील पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांना टोचत आहे. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील हे एकमेकांची उणीदुणी काही कार्यक्रमात व्यक्त करत आहेत. विद्यमान आमदार यांच्यावर लक्ष केंद्रीत न करता दोघे परस्परांस विरोधक समजत आहेत. राधानगरीतून विधानसभेसाठी धैर्यशील पाटील यांना इच्छुक करण्यात के. पी. यांचा हात असावा, तर भुदरगडमधून जि.प. सदस्य जीवन पाटील यांना इच्छुक करण्यात ए. वाय. यांचा हात असावा असा आरोप एकमेकांकडून होत आहे.
ए. वाय. पाटील शांत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून चर्चेला उधाण आणले आहे. साहेब कोणी काहीही म्हणो, आता थांबायचं नाही, वरिष्ठांनी केलेल्या वक्तव्याकडे कानाडोळा करून कोणावर कोणतीही टीका करू नका, संयम बाळगा असा संदेश पाठवले आहेत. आपण विधानसभा लढणारच आहोत, असे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. यामुळे राजकीय वाद तीव्र झाला आहे.
सबुरीने राहण्याचा सल्ला
ए. वाय. व के. पी. यांची धुसफूस पक्षाला अडचण ठरणार असल्याने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सबुरीने राहण्याचा सल्ला दिला आहे. जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करून पुन्हा एकदा ए. वाय. यांची राजकीय ताकद वाढवली आहे. कसबा वाळवे येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार मुश्रीफ यांनी अनुभव व ज्येष्ठतेनुसार विधानसभेसाठी के. पी. पाटील यांचे समर्थन केल्याने ए. वाय. पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. याबाबत ए. वाय. पाटील यांनी मौन पाळले आहे.