‘दौलत’चा विषय विधानसभेपूर्वीच संपला : राजेश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:04+5:302021-04-01T04:26:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत शाहू आघाडीला पाठिंबा देणे व ‘दौलत’ साखर कारन्याचा काहीही संबंध नाही. जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत शाहू आघाडीला पाठिंबा देणे व ‘दौलत’ साखर कारन्याचा काहीही संबंध नाही. जिल्हा बँकेने २०१९ लाच ‘दौलत’ चालविण्यास देण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपला होता, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे आमदार राजेश पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमदार पाटील यांनी ‘गोकुळ’साठी अर्ज दाखल केला, त्यानंतर ते म्हणाले, मागील निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक व मंत्री हसन मुश्रीफ यांची आघाडी होती, त्यामध्ये आपणास संधी मिळाली. सहा वर्षे त्यांच्यासोबत काम केले, तेथील अनुभवाचा आमच्या संस्था चालवताना उपयोग झाला. आता निर्णय घेताना कठीण परिस्थिती होती, तरीही चंदगडच्या जनतेला विश्वासात घेऊनच आम्ही निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विश्वास टाकून विधानसभेला उमेदवारी दिली, मंत्री हसन मुश्रीफ यांनी ताकद दिल्याची जाणीव आहे. आताही मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आश्वासित केले आहे. शाहू आघाडीला पाठिंबा देण्यास विलंब झाला हे जरी खरे असले तरी त्याला ’दौलत’ची किनार नाही. ज्यावेळी जिल्हा बँकेने ‘दाैलत’ चालविण्यास दिला, त्यावेळी आमच्या दृष्टीने हा विषय संपला होता. त्यामुळे कोणीतरी हा मुद्दा जाणीवपूर्वक पुढे करत आहे. यावेळची निवडणूक वेगळ्या टप्यांवर आहे, दूध उत्पादक व ठरावधारक अभ्यासू आहेत. संघाच्या हित पाहणाऱ्या योग्य माणसांची ते निवड करतील, त्यामुळे चांगल्या लोकांच्या हातातच ‘गोकुळ’ जाईल.