विकासाच्या मुद्द्यांंना तिलांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:05 AM2019-04-10T00:05:01+5:302019-04-10T00:05:06+5:30
इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार व पक्षांकडून विकासाच्या मुद्द्यांऐवजी एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, चिखलफेकीच्या ...
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार व पक्षांकडून विकासाच्या मुद्द्यांऐवजी एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, चिखलफेकीच्या पलीकडे विकासाच्या मुद्द्यावर प्रचारच केला जात नसल्याचे संकुचित चित्र आहे. शेतीमालाला हमीभाव, तरुणाईला रोजगार यासह अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास, शाहू जन्मस्थळ, शाहू मिल स्मारक, चित्रनगरी, पंचगंगा प्रदूषण, पाणी योजना, यंत्रमाग, अशा रखडलेल्या प्रकल्पांवर आपण काय भूमिका घेणार या मुद्द्यावर कोणीच काही बोलायला तयार नाही.
काही वर्षांपूर्वीपर्यंत निवडणुकीचा प्रचार म्हणजे उमेदवारापुढे विकासाचा अजेंडा असायचा. प्रचारात कोणते मुद्दे मांडायचे, निवडणुकीदरम्यान समाजापुढे अथवा मतदारसंघापुढे असलेल्या प्रश्नांची जाणीव असायची. पक्षाच्या चिन्हावर उभारलेल्या उमेदवाराकडून काही आश्वासने दिली जायची आणि दिलेला शब्दही पाळला जायचा. आता मात्र आम्ही काय विकास करणार यापेक्षा समोरच्या उमेदवारावर जहरी-कडवी टीका, त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढून हशा, शिट्या आणि टाळ्या मिळविणे या पलीकडे प्रचाराची चौकट गेलेली नाही.
कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक व भाजप-शिवसेना युतीचे प्रा. संजय मंडलिक यांची लढत होत आहे. आपल्या प्रचाराच्या मुद्द्यात खासदार महाडिक हे आपण मार्गी लावलेल्या कोल्हापूर रेल्वेस्टेशन, विमानतळ, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे, शिवाजी पूल या प्रश्नांचा मुद्दा आवर्जून मांडतात; पण त्याचवेळी विरोधी उमेदवारावर शरसंधानही साधले आहे. दुसरीकडे संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सुरुवातच होते ती सदाशिवराव मंडलिक यांच्या कामापासून. हे सांगताना मी स्वत: काय करणार या मुद्द्यांचा काहीच अजेंडा त्यांच्याकडे नसल्याचे दिसते.
हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टीविरुद्ध धैर्यशील माने अशी लढत होत आहे. यात राजू शेट्टी यांनी भाजप सरकार व नरेंद्र मोदींना टार्गेट करताना विरोधी उमेदवार पाच वर्षे कुठे होते? शेतकऱ्यांच्या प्रश्नात त्यांनी लक्ष का घातले नाही? असा प्रश्न विचारत आहेत, तर धैर्यशील माने हे शेट्टींची चळवळ म्हणजे स्टंटबाजी आणि शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असे सांगत आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांतील तुल्यबळ उमेदवार मी खासदार झाल्यानंतर कोणते प्रश्न मार्गी लावणार; त्यासाठी माझ्यासमोर अमुक एक कृती आराखडा आहे, हे छातीठोकपणे मांडताना दिसत नाहीत. पक्षांनी काढलेल्या जाहीरनाम्यांचा तर नामोल्लेखही होत नाही.
वारसदार विरुद्ध खासदार
मंडलिक यांच्या प्रचारात नेते संसदरत्न खासदाराने किती प्रश्न मांडले यापेक्षा किती सोडविले? ग्रामीण भागाचा किती विकास केला? यावर प्रश्न उपस्थित करीत आहेत. दुसरीकडे धनंजय महाडिक हे खासदारपुत्र किंवा वारसदार होऊन निवडणूक जिंकता येत नाही. नॉट रिचेबल उमेदवार अशी टीका करीत आहेत. हातकणंगलेत धैर्यशील माने यांनी केवळ शेतकऱ्यांचा मुद्दा पुढे केला, की मतदारसंघातील प्रश्न संपले का? अशी विचारणा करीत आहेत. तर राजू शेट्टी हे पाणी, ऊस, यंत्रमाग या बहुजनांच्या विषयांवरच्या आंदोलनावेळी विरोधी उमेदवार कुठे होत? असा जाब विचारत आहेत.
प्रश्नांची जंत्रीच..
कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाला पंचगंगा प्रदूषणाचा मोठा विळखा आहे; त्यामुळे दोन्ही भागांतील नागरिक प्रभावित होत आहेत.
अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा गेली आठ वर्षे मार्गी लागलेला नाही. मंजुरी मिळूनही एक रुपयांचा निधी नाही.
शाहू जन्मस्थळाच्या मागचे शुक्लकाष्ठ काही संपायचे नाव घेत नाही.
शाहू मिल येथे साकारण्यात येणाºया शाहू स्मारकची तर चर्चाच नाही.
सुसज्ज चित्रनगरीचे अस्तित्व सध्या केवळ देखाव्यापुरते राहिले आहे.
हातकणंगले मतदारसंघात पाणी उपस्यावरून वातावरण तापले आहे.
शेतमालाला हमीभाव, यंत्रमाग उद्योगाची अवस्था, बेरोजगारी यावर मी काय करणार, हे कोणी मांडायला तयार नाही.
ग्रामीण भागात अजूनही रस्ते, पाणी, शिक्षण अशा मूलभूत सोर्इंचा अभाव आहे.