उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:56+5:302021-08-12T04:28:56+5:30
कोल्हापूर : आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण आहे, त्यात ती खिचडी, साबुदाणा वडा असं काही असेल तर तिप्पट ...
कोल्हापूर : आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण आहे, त्यात ती खिचडी, साबुदाणा वडा असं काही असेल तर तिप्पट खाशी म्हणावे लागते. हा पदार्थ न आवडणारी व्यक्ती क्वचितच असेल पण अहो जरा थांबा तुम्ही उपवासाच्या दिवशी साबुदाणा खात असाल तर तो टाळलेलाच बरा. हा पदार्थ जितका चमचमीत तितकाच पचायला जड, त्यामुळे अनेकांना पचनाचे त्रास, पित्त, पोट फुगणे अशा आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते.
श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे, याकाळात उपवास मोठ्या प्रमाणात केले जातात. काही जण पूर्ण श्रावण महिना एकवेळ जेवतात, बऱ्याच जणांचा श्रावण सोमवार, मंगळवार, शुक्रवार, मंगळागौरी व्रत, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नागपंचमी असे वेगवेगळे उपवास असतात. उपवास म्हटले की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती साबुदाण्याची खिचडी. रात्रभर भिजलेली मऊशार खिचडीचा एक एक घास चवीने खाणे ही प्रत्येकाची आवड. मग त्यात साबुवडा म्हणजे ताव तर मारलाच पाहिजे. पण ही खिचडी चवीला जितकी चांगली तितकीच पचायला जड असते. हा पदार्थ चिकट असल्याने मैद्याप्रमाणे तो देखील पचायला वेळ घेतो. त्यामुळे दिवसभर किंवा त्यानंतरही आरोग्याच्या तक्रारी जाणवायला सुरू होतात. त्यामुळे उपवास करत असाल तर शक्यतो खिचडी टाळलेलीच बरी.
---
उपवासाच्या पदार्थाचे दर (प्रतिकिलो)
पदार्थ : १० जुलै : १० ऑगस्ट
भगर(वरी) : १२० : १२८
साबुदाणा : ६० : ६०
नायलॉन साबुदाणा : ८८ : ८८
--
वरीचा दर का वाढला...
अनेकजण उपवासाच्या दिवशी वरीचे उप्पीट, वरीचे थालीपीठ अशा पदार्थांना प्राधान्य देतात. पचनाच्या तक्रारी असलेले व डायटवर असलेले लोकही साबुदाणा टाळतात. त्यामुळे अलीकडे वरीचा वापर वाढला आहे. ही वरी नाशिकवरुन येते. महापूर, कोरोना, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर अशा विविध कारणांमुळे वरीचे दर वाढले आहेत.
----
साबुदाणा आरोग्याला हानिकारक
साबुदाण्यामध्ये फक्त कार्बोहायड्रेटस असतात, प्रोटिन मिळत नाही. हा पदार्थ पचायला जड असल्याने पचनक्रिया मंदावते, त्यामुळे पोट फुगणे, पोट दुखणे, गॅसेसच्या तक्रारी वाढतात. पित्ताचा त्रास होतो.
--
उपवास आहे, मग हे पदार्थ खा !
साबुदाण्याऐवजी तुम्ही वरीचे थालीपीठ, उप्पीट, आंबोळी करुन खाऊ शकता, राजगिऱ्याचे लाडू, गूळ शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचा लाडू, केळी, सफरचंद, पेरू, चिकू अशी फळे, दूध, दही, ताक, पंचामृत, रताळे बटाट्याचे थालीपीठ किंवा कीस असे वेगवेगळे पदार्थ उपवासाला खाता येतात.
---
साबुदाणा चिकट पदार्थ असल्याने तो लवकर पचत नाही. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात त्याऐवजी ताजी फळं, वरी, ड्रायफ्रूटस्, दूध, ताक, दही अशा हलक्या पदार्थांचे सेवन करावे.
उर्मिला ठाणेकर
आहारतज्ज्ञ
---