TET Exam : भावी गुरुजींना इंग्रजीने फोडला घाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 03:56 PM2021-11-24T15:56:30+5:302021-11-24T15:58:17+5:30
संतोष मिठारी कोल्हापूर : तीन वेळा लांबणीवर पडलेली डीएड, बीएड पात्रताधारकांसाठीची शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) रविवारी (दि. २१) झाली. ...
संतोष मिठारी
कोल्हापूर : तीन वेळा लांबणीवर पडलेली डीएड, बीएड पात्रताधारकांसाठीची शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) रविवारी (दि. २१) झाली. ही परीक्षा देणाऱ्या भावी गुरुजींना पेपरमधील इंग्रजी विषयाच्या प्रश्नांनी घाम फोडला. गणिताचे प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ लागला. समाजशास्त्रातील प्रश्न किचकट असल्याचे परीक्षार्थींनी सांगितले.
कोल्हापूर शहरातील विविध ३३ केंद्रावर राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा देण्यासाठी १७६०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५१९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २४१३ जण गैरहजर राहिले. या परीक्षेसाठी प्रत्येकी दीडशे गुणांचे दोन पेपर होते. त्यात भाषा, बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र, गणित, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवरील प्रश्न होते. त्यातील इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, सामाजिकशास्त्रे, इतिहास या विषयावरील प्रश्न कठीण असल्याची प्रतिक्रिया कोल्हापुरातील परीक्षार्थींनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे : ३३
विद्यार्थी पहिला पेपर दुसरा पेपर
नोंदणी केलेले ८७३१ ८७३
उपस्थित ७३८५ ७८०६
अनुपस्थित १३४६ १०६७
लॉजिकल रिझनिंगही अवघड
इंग्रजीतील परिच्छेदावरील प्रश्न होते; मात्र त्याची उत्तरे त्यात नव्हती. त्याबाबतचे लॉजिकल रिझनिंग अवघड होते. सामाजिकशास्त्रात किचकट प्रश्न होते. बालमानसशास्त्रातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती. त्यातील प्रश्न फिरवून विचारले होते, असे परीक्षार्थी योगिता पाटील यांनी सांगितले.
एसटीच्या संपाचा फटका
एसटीचा संप असल्याने इचलकरंजी, चंदगड, राधानगरी, गडहिंग्लज, पन्हाळा, गारगोटी आदी ठिकाणांहून मिळेल त्या वाहनाने परीक्षार्थी आले. त्यात काहींना परीक्षा केंद्रावर येण्यास दोन ते दहा मिनिटांचा वेळ लागला. निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रात आले नसलेल्या सुमारे शंभर परीक्षार्थींना परीक्षेला मुकावे लागले.
आता तयारी अभियोग्यता परीक्षेची
शिक्षक पात्रतेसाठी टीईटी परीक्षा झाली. त्यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची आता फेब्रुवारीमध्ये अभियोग्यता परीक्षा होणार आहे. त्याची तयारी विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. शिक्षक म्हणून भरती होण्यासाठी अभियोग्यता परीक्षा महत्त्वाची आहे.
परीक्षार्थी म्हणतात
इंग्रजी, बालमानसशास्त्रावरील प्रश्न कठीण होते. गणिताच्या काही प्रश्नांमध्ये मागील प्रश्नपात्रिकांमधील प्रश्नांशी साधर्म्य होते. गणिताचे प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ लागला. -गीता माळी, मुडशिंगी.
पहिला पेपर बरा गेला. इतिहास, सामाजिकशास्त्रे या विषयांवरील प्रश्न किचकट स्वरूपाचे होते. इयत्ता आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमांवरील प्रश्न अपेक्षित होते; मात्र त्याबाहेरील प्रश्न होते. -पूजा एकोंडे, रूकडी
इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती. पूर्वी इंग्रजीतील परिच्छेदावरील प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये होती. यावेळचे पेपर तसे नव्हते. उत्तरे लिहिताना अधिक विचार करायला लागला. -विशाखा पाटील, गडमुडशिंगी.