जुना राजवाडा वास्तूचा चुकीचा इतिहास मांडणे क्लेशदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 12:58 PM2021-03-22T12:58:36+5:302021-03-22T13:06:35+5:30
Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur-ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला जुना राजवाडा या वास्तूचा इतिहास संकेतस्थळावर चुकीच्या पद्धतीने मांडला जाणे क्लेशदायक आहे, अशा शब्दात खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या मूर्तिमंत वैभवशाली इतिहासाचे अयोेग्य पद्धतीने होत असलेल्या या सादरीकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून पर्यटनस्थळांची दिलेली माहिती पडताळून पाहावी, असा सल्लाही दिला आहे.
कोल्हापूर : ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला जुना राजवाडा या वास्तूचा इतिहास संकेतस्थळावर चुकीच्या पद्धतीने मांडला जाणे क्लेशदायक आहे, अशा शब्दात खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या मूर्तिमंत वैभवशाली इतिहासाचे अयोेग्य पद्धतीने होत असलेल्या या सादरीकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून पर्यटनस्थळांची दिलेली माहिती पडताळून पाहावी, असा सल्लाही दिला आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या कोल्हापूर डॉट गर्व्ह डॉट इन या संकेतस्थळावर जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांची माहिती दिली आहे. या अंबाबाई मंदिरासह भवानी मंडप व जुना राजवाडा विषयी चुकीची माहिती दिल्याचे लोकमतने रविवारच्या अंकात उघडकीस आणले. याची दखल घेत खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पत्र काढून यात लक्ष घालण्याची आणि चुकीचा इतिहास पसरू नये यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
पत्रात संभाजीराजे म्हणतात, पर्यटनस्थळांची माहिती व इतिहास माहीत व्हावा हा संकेतस्थळ विकसित करण्यामागील हेतू चांगला आहे, पण सत्यतेची पडताळणी न करता माहिती अपलोड करणे म्हणजे पर्यटकांची दिशाभूल आणि चुकीचा इतिहास पुढे रेटण्यासारखे आहे.
भवानी मंडप हा जुना राजवाडा या ऐतिहासिक वास्तूचा एक भाग मात्र आहे, जो राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या कन्या आक्कासाहेब महाराज यांच्या विवाहाप्रित्यर्थ जुन्या राजवाड्याच्या मुख्य वास्तुसमोर १९०८ मध्ये बांधला. हा खरा इतिहास असताना तो सदाखान यांनी बांधला असा संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख केला असल्याचेही संभाजीराजे यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले.
जुन्या राजवाड्यामध्ये शाहू महाराजांचे थडगे असल्याचा उल्लेखही अत्यंत बेजबाबदारपणे केले आहे. या राजवाड्यात तुळजाभवानी देवीचे मंदिर असल्याचे सांगितले आहे, पण ते मंदिर नसून छत्रपती घराण्याचे देवघर आहे, त्यास अंबा देवघर म्हटले जाते, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.
करवीर राज्याचा राज्यकारभार जिथून चालला, १८५७ च्या क्रांतिकारक उठावाची सूत्रे चिमासाहेब महाराजांनी जिथून सांभाळली, राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला त्या ऐतिहासिक क्षणाच्या भवानी मंडपाविषयी चुकीचा इतिहास पसरवणे हे अतिशय बेजबाबदार आणि वेदनादायी कृत्य आहे. तो हटवून जुन्या राजवाड्यासह पन्हाळगड, अंबाबाई मंदिर, इतर ऐतिहासिक पर्यटनस्थळांची माहिती याक्षेत्रातील तज्ज्ञांकडून पडताळून घेतल्याशिवाय अपलोड करू नये, योग्य माहितीसह संदर्भपूर्ण इतिहास संकेतस्थळावर प्रकाशित करावा, असे आवाहनही केले आहे.