Kolhapur: करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला ३०९ वर्षे पूर्ण
By संदीप आडनाईक | Published: September 28, 2024 03:52 PM2024-09-28T15:52:14+5:302024-09-28T15:53:13+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली. तीन ...
संदीप आडनाईक
कोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली. तीन शतकांपूर्वी झालेल्या परकीय आक्रमण काळात मूर्तीचे संरक्षण व्हावे यासाठी तत्कालीन श्रीपूजकांपैकी एकाने ही मूर्ती एका घरात लपवून ठेवली होती. नंतर करवीर संस्थानाची स्थापना झाल्यानंतर या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे हा दिवस कोल्हापूरसाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशातून लाखो भाविक येत असतात. या मंदिराला मोठा इतिहास आहे. मंदिरात गाभाऱ्यात विराजमान झालेल्या श्री अंबाबाईचा मूर्तीचा इतिहासही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली, अशी माहिती मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली.
आदिलशाहीत मोगलांनी मंदिरांचा विध्वंस केला, तेव्हा देवीची मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ग्रामदैवत असलेल्या कपिलेश्वर मंदिरामागे राहणाऱ्या तत्कालीन श्रीपूजकांनी ती स्वतःच्या घरी लपवून ठेवली, तशी नोंद करवीर माहात्म्यात आहे. १७१० मध्ये करवीर संस्थानाची स्थापना झाली. त्यानंतर संभाजी महाराज दुसरे यांच्या कारकिर्दीत १७१५ ते १७२२ या कालखंडात या मंदिराचे पुनरुज्जीवन झाले.
वेदशास्त्रसंपन्न नरहर भट प्रधान (सावगावकर) यांनी पन्हाळगडावर जाऊन संभाजी महाराज छत्रपतींना अंबाबाईच्या मूर्तीविषयी आणि त्यांना मिळालेल्या दृष्टांताची माहिती दिली. त्यांनी सिदोजीराजे गजेंद्रगडकर घोरपडे यांना आज्ञा दिल्यानंतर मन्मथ नाम संवत्सर इंदूवासर (सोमवार) विजयादशमी (दसरा) म्हणजे २६ सप्टेंबर १७१५ या दिवशी अंबाबाईच्या मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठापना केली.
सध्या नित्यपूजेमधील श्री अंबाबाई मूर्तीचे वर्णन सर जोशीराव यांच्या गारेचा गणपती मंदिरातील खांबावरील १२ व्या शतकातील शिलालेखात आहे. मूर्तीच्या हातात म्हाळुंग, गदा, ढाल, पानपात्र असून, मूर्ती अडीच फुटांची आहे. मस्तकावर संयोनी लिंग आहे. कोल्हापूरच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. -उमाकांत राणिंगा, मूर्ती अभ्यासक