सुरू झाली लगीनघाई
By admin | Published: October 6, 2015 01:04 AM2015-10-06T01:04:40+5:302015-10-06T01:12:13+5:30
महापालिका निवडणूक : क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारांची धांदल; अधिकाऱ्यांत गोंधळ
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यास काही अवधी शिल्लक असताना सोमवारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, उमेदवार यांच्याबरोबरच प्रशासकीय पातळीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांत कमालीची उत्कंठा पाहायला मिळालीच शिवाय निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवारांची उडालेली धावपळ आणि अधिकाऱ्यांमधील गोंधळही ठळकपणे जाणवला. निवडणूक कार्यालयात युद्धपातळीवर सर्व सुविधा उपलब्ध करून देताना अधिकाऱ्यांनाच चांगलाच घाम फुटला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आठव्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया आज, मंगळवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीकरिता महानगरपालिकेच्या ताराबाई गार्डन येथील मुख्य निवडणूक कार्यालयासह शहरातील सातही क्षेत्रीय निवडणूक कार्यालयात सोमवारी अक्षरश: लगीनघाई अनुभवयास मिळाली.
कार्यालयातील एकंदर वातावरण पाहता सगळा विस्कळीतपणा दिसून आला. निवडणुकीच्या निमित्ताने सुरू केलेल्या सातही क्षेत्रीय कार्यालयांत निवडणूक निर्णय अधिकारी, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य कर्मचाऱ्यांना बसण्यासाठीचे फर्निचर, कपाटे, अन्य निवडणूक साहित्य मिळण्यास विलंब झाला. सर्व साहित्य कार्यालयांतून सोमवारी पोहोचले, त्यामुळे बैठक व्यवस्थेपासून सर्व कामकाज करण्यात दिवस गेला. त्यात इच्छुकांच्या गर्दीने व त्यांच्या प्रश्नांनी अधिकाऱ्यांना भंडावून सोडले होते. (प्रतिनिधी)
गोंधळातच संपला दिवस...
शहरातील अनेक कार्यकर्ते मुख्य कार्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालयांत विविध शंका-कुशंका मनात घेऊन माहिती विचारण्यास येत होते; परंतु नेमकी माहिती कोणत्याही अधिकाऱ्याला देता येत नव्हती. अनेक प्रकारची माहिती विचारली जात होती; परंतु विचारणाऱ्या व्यक्तीचे समाधान होत नव्हते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाचे तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दर्जाचे अधिकारी काम पाहत आहेत; परंतु त्यांनाही सुविधा मिळविण्यासाठी ताटकळत बसावे लागले. त्यातूनच प्रशासकीय पातळीवरील गोंधळ दिसून आला. मुख्य निवडणूक कार्यालयात तर अनेक कर्मचाऱ्यांना बसायलाही जागा नव्हती, बरेच कर्मचारी उभे राहूनच काम करताना पाहायला मिळाले. कोण काय करतोय, कोणाकडे कोणत्या कामाची जबाबदारी आहे याबाबत नेमकी कोणाकडेच माहिती उपलब्ध नव्हती. सोमवारचा दिवस असा गोंधळात संपला.
प्रभागनिहाय याद्या उपलब्ध
मतदार याद्या दुरुस्तीचा घोळ कायम असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी जेव्हा पक्क्या याद्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा त्या तातडीने उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय झाली; परंतु सोमवारी मात्र पालिकेच्या चार विभागीय कार्यालयांत प्रभागनिहाय मतदार याद्या दहा-दहा प्रतीत विक्रीला ठेवण्यात आल्या. मतदार याद्या उपलब्ध करून देतानाही अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
मतदारयादीतील जुन्या चुका कायम
प्रचंड नाराजी : अनेकजण मतदानास मुकणार
कोल्हापूर : प्रारूप मतदार याद्यांत झालेल्या प्रचंड चुका शहरातील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासन तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणूनदेखील त्याच त्या चुका आता अंतिम मतदार याद्यांत राहून गेल्या आहेत. त्यामुळे हरकतीनुसार मतदार याद्यात दुरुस्त्या केल्याचा मनपा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. मतदार याद्यांतील गोंधळामुळे शहरातील हजारो मतदारांना त्यांच्या लोकशाहीने दिलेल्या हक्कापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१५ ही तारीख गृहीत धरून मतदार याद्या घेण्यात आल्या आहेत. त्यावरून प्रभागनिहाय कच्च्या (प्रारूप) मतदार याद्या तयार करण्यात आल्या; परंतु प्रभागांच्या प्रारुप याद्या तयार करताना मोठ्या प्रमाणात चुका झाल्या. राजकीय क्षेत्रात तसेच निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांत त्यामुळे खळबळ उडाली होती. या याद्यांवर १३२६ हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने अधिकारीही हतबल झाले. प्राप्त हरकतींनुसार सर्वच मतदार याद्यांत दुरुस्त्या करण्यात आल्या, असे सांगण्यात आले.
शनिवारी ८१ प्रभागांच्या पक्क्या मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. त्यावेळी प्रारूप मतदार याद्यांतील चुका पक्क्या मतदार यादीतही तशाच राहिल्याची गंभीर बाब लक्षात आली. असंख्य मतदारांचे प्रभाग बदलले आहेत. अनेकांच्या नावांत चुका राहिल्या आहेत. त्यामुळे याद्यांबाबत तीव्र असंतोष पसरला आहे.
रामानंदनगर प्रभागातील संजय पाटील वगैरे कार्यकर्त्यांनी सुमारे ३५० मतदारांच्या नावांची एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात अदलाबदल झाल्याची बाब तक्रार अर्जाद्वारे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु जेव्हा पक्की मतदार यादी प्रसिद्ध झाली तेव्हा २६२ मतदारांची नावे ही रामानंदनगर प्रभागातून शेजारच्या रायगड कॉलनी प्रभागात समाविष्ट झाल्याचे दिसून आले तर जरगनगर प्रभागातील २५ मतदारांची नावे आणि कळंबा फिल्टर हाऊसमधील १५ मतदारांची नावे ही रामानंद प्रभागाला जोडण्यात आली आहेत. अशाच प्रकारच्या चुका अन्य प्रभागांतही झाल्या आहेत. शहरातील हजारो मतदारांची नावे ही एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट झाली असल्याने त्यांना मतदानाचा हक्क गमवावा लागण्याची शक्यता आहे.
आयोगाकडे तक्रार करणार
प्रारुप मतदार याद्यांमधील चुकांबाबत तकार देऊनही त्या मनपा प्रशासन अथवा आयोगाकडून दुरुस्त करण्यात आल्या नाहीत, ही गंभीर बाब असून, त्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे आपण भागातील नागरिकांच्यावतीने तक्रार दाखल करणार असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले.