गगनबावड्यात सतेज पाटील यांची भूमिका ठरणार महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:08 AM2019-04-06T00:08:57+5:302019-04-06T00:09:06+5:30
चंद्रकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क गगनबावडा : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून २०१४ मध्ये निवडून आलेले राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार ...
चंद्रकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गगनबावडा : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून २०१४ मध्ये निवडून आलेले राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक या भागाचे नेतृत्व करत आहेत. त्यांना या तालुक्यातून मताधिक्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्याविरुद्ध मोट बांधण्यासाठी मतदारसंघात विरोधकांकडून व्यूहरचना आखली जात असून, पडद्याआडच्या हालचाली येत्या काही दिवसांत गतिमान होणार आहेत.
गगनबावडा तालुक्यावर गेल्या काही वर्षांपासून डॉ. डी. वाय. पाटील सह. साखर कारखान्याचे चेअरमन आ. सतेज पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी महाडिक यांच्या ताराराणी आघाडीकडून जि. प., पं. स. निवडणुकीवेळी प्रयत्न झाला.
गगनबावडा तालुक्यातील जि.प.चे दोन्ही व पं.स. चार पैकी तीन मतदारसंघात आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे वर्चस्व आहे. तर पं.स.च्या एका मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याचे मानले जात आहे. पी. जी. शिंदे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात भाजपला पाठबळ मिळाले आहे. भाजप जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष नंदकुमार पोवार यांच्यासोबत ते भाजपचा रथ हाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिंदे यांच्यामुळे गगनबावडा तालुक्यात भाजप नेतृत्वाखालील पक्षाला उभारी मिळेल, अशी धारणा यामागे भाजप नेतृत्वाची आहे. मात्र, त्यातही त्यांना फारसे यश आले नाही. या तालुक्यात आ. पाटील यांची भूमिका मोलाची ठरणार आहे.
सदाशिवराव मंडलिक यांच्याबद्दल या तालुक्यात तितकीच सहानूभुती आहे. त्यांचेच पुत्र शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक या निवडणुकीत सेनेचा धनुष्यबाण घेऊन उभे ठाकणार आहेत. त्यांना आ. चंद्रदीप नरके यांची साथ मिळणे अपेक्षित आहे. तर गेल्या वर्षभरापासून खासदार महाडिक यांनी या तालुक्यातील संपर्क वाढविला आहे. वैभववाडी रेल्वे, गगनबावडा औद्योगिक वसाहतीचे स्वप्न साकार करण्याचे आश्वासन त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून येथील कार्यक्रमात दिलेले आहे.
पी. जी. शिंदे यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेतला असला तरी भाजप-सेना युतीमुळे ते कोणती भूमिका घेतात, हे गुलदस्त्यात आहे. गगनबावडा तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर आ. सतेज पाटील यांच्या गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. येत्या काही दिवसांत दिसणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेवर या निवडणुकीचे चित्र अवलवंबून आहे.