तेढ निर्माण करणारे फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्यास फौजदारी; विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 02:16 PM2024-07-18T14:16:25+5:302024-07-18T14:16:38+5:30
विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कलम १६३ लागू
कोल्हापूर : किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणाबाबत काही घटकांकडून सामाजिक तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण, चित्रीकरण, छायाचित्रे समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात कलम १६३ लागू केले आहे. याअंतर्गत इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुकद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे, तसेच बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास सक्त मनाई केली असून, तसे आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
विशाळगड येथे अनधिकृत अतिक्रमणाविरोधात रविवारी झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने जिल्ह्यातील वातावरण बिघडले आहे. कार्यकर्त्यांनी अचानक दगडफेक करून सार्वजनिक शांततेचा भंग केला, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करून नुकसान केले. वरील सर्व घटनांचे व्हिडीओ, रील्स, फोटो काही लोक सोशल मीडियामार्फत, तसेच प्रसारमाध्यमामधून पसरवून समाजामध्ये अस्थिरता निर्माण करीत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून प्रक्षोभक संदेशाद्वारे अफवा पसरविल्या जात आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट, स्टेटस ठेवून तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे कलम लागू केले आहे.