कोरडे अध्यादेश काढून लोकांना मूर्ख बनविण्याचा धंदा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 06:37 PM2024-10-05T18:37:39+5:302024-10-05T18:38:26+5:30
मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांमध्ये राज्याची तिजोरी सफाईदारपणे सफाई करण्याची स्पर्धा
कोल्हापूर : कोरडे अध्यादेश काढून लोकांना मूर्ख बनविण्याचा नवीन धंदा राज्यात सुरू झाला आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर शुक्रवारी हल्लाबोल केला.
मागच्या महिन्या दोन महिन्यात जे अध्यादेश काढले गेले त्यांची संख्या जवळपास ३५० इतकी आहे आणि त्याची अंमलबजावणी करायची म्हटले तर एक लाख ४४ हजार कोटी रुपये लागणार आहेत. मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांमध्ये राज्याची तिजोरी सफाईदारपणे सफाई करण्याची स्पर्धा लागली आहे. जे मिळेल ते लुटा असं सगळं राज्य चालले असल्याची टीका त्यांनी केली.
जे जे अध्यादेश काढले, त्यामुळे लोक दुखावले जात आहेत. धनगरांसाठी अध्यादेश काढला, त्यामुळे ओबीसी दुखावला गेला. तो मंत्रालयात उड्या मारतो आहे. त्यांनी भेटायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. केवढे दुर्दैव आहे. उपेक्षित आमदारांना तीन दिवसापासून वेळ मिळत नसेल तर राज्यकर्ते कोणत्या लायकीचे आहेत हे स्पष्ट झाले, असे वडेट्टीवार म्हणाले.
..त्यावेळी दिवा जास्त फडफडतो
दिवा विझायला लागतो त्यावेळी जास्त फडफडतो. महायुतीचा दिवा विझणारच आहे. त्यातील तेल संपले आहे. सरकारचे तेल आता संपले आहे. कालच तीस हजार कोटींचे ओव्हरड्राफ्ट सरकारने काढले. म्हणजे कर्ज काढून लग्न करा आणि घराला बरबाद करा, असा सरकारचा फंडा दिसतोय, असेही ते म्हणाले.