फसवून गेलेल्यांना जनताच उत्तर देईल, सतेज पाटील यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 01:29 PM2024-11-01T13:29:07+5:302024-11-01T13:29:57+5:30
लाटकर आमच्यासोबतच राहतील
कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’च्या निवडणुकीत स्वर्गीय चंद्रकांत जाधव व पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांच्यासाठी जीवाचे रान केले. मात्र, पक्ष सोडून जाताना आमदार जयश्री जाधव यांनी कोणतीही चर्चा केली नाही. एका रात्रीत निघून गेलेल्यांना कोल्हापूरकर विसरणार नसून फसवून गेलेल्यांना जनताच उत्तर देईल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी आमदार जयश्री जाधव यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. तुमच्या निवडणुकीसाठी जे राबले त्यांना तुम्ही काय उत्तर देणार? असा सवालही पाटील यांनी विचारला.
जयश्री जाधव यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. यावर सतेज पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जयश्री जाधव या कालपर्यंत आमच्या संपर्कात होत्या. गुरुवारी खासदार शाहू छत्रपती त्यांना भेटणारही होते. मात्र, असे काय झाले की त्यांनी एका रात्रीत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशासाठी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? जाधव कुटुंबाचा व्यवसाय असल्याने या दबावाला व्यावसायिक कारण आहे का याचा खुलासा जाधव यांनीच करावा.
महायुती उमेदवाराच्या पायखालची वाळू सरकली असल्यानेच त्यांना फोडफोडी करावी लागत आहे. पण, हे फोडाफोडीचे राजकारण यशस्वी होणार नाही. आम्ही फोडाफोडी करणार नाही, तेथे आम्ही करेक्ट कार्यक्रम करू. काँग्रेसने असे अनेक धक्के पचविले आहेत. त्यामुळे जे फसवून जातात त्यांना जनताच उत्तर देते.
जाधव कुटुंबासाठी अशोभनीय
जाधव कुटुंब हे कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे प्रतिष्ठित कुटुंब आहे. मात्र, त्यांनी जो निर्णय घेतला तो या कुटुंबाला शोभणारा नाही. पेठेमधीलही अनेकांना ते आवडलेले नाही, या शब्दांत आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
चर्चा केली तरीही..
सतेज पाटील म्हणाले, जयश्री जाधव या विधानसभेसाठी पुन्हा इच्छुक होत्या. उमेदवारीची मागणीही त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांना तीन-चार वेळा भेटून मतदारसंघातील परिस्थिती त्यांना समजावून सांगत उमेदवारी करू नये, अशी विनंती केली. त्यांनी ती मान्यही केली. मात्र, अचानक काय परिवर्तन झाले माहीत नाही. शिंदेसेनेला त्यांच्यासाठी चार्टर्ड विमान पाठवून त्यांचा पक्षप्रवेश करावा लागला.
जाधव यांचे काम चांगले पण..
जयश्री जाधव या काँग्रेसच्या आमदार होत्या. त्यांनी शहरात चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मी टीका करणार नाही असे सांगत पाटील यांनी किमान जाताना किंवा काही अडचण असल्यास माझ्याशी बोलायला हवं होतं अशी अपेक्षा व्यक्त केली.
१०० कोटींची बोगस कामे
१०० कोटी रुपयांचे रस्ते आणले म्हणून काहींनी गवगवा केला. पण सहा सहा महिने वर्क ऑर्डर झाली नाही. वर्क ऑर्डर का देत नाही असे पालकमंत्र्यांना विचारावे लागले. तरी आयुक्तांनी वर्क ऑर्डर दिल्या नाहीत इतका दबाव मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर होता. सगळी बोगस कामे केली असून जनता साथ देणार नसल्यानेच त्यांना फोडाफोडी करावी लागत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.
लाटकर आमच्यासोबतच राहतील
राजेश लाटकर यांच्याबरोबर चर्चेची एक फेरी झाली असून, दुसरी फेरी लवकरच करणार आहे. ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते असून, ध्रुवीकरणाच्या काळात ते इतर कोणताही निर्णय घेणार नाहीत, ते आमच्यासोबतच राहतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.