'गोकुळ' मल्टिस्टेटचा निर्णय घेणाऱ्यांनी खासगीकरणाचा आरोप करणे हास्यास्पद, अरुण डोंगळे यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:53 PM2024-08-30T12:53:32+5:302024-08-30T12:53:46+5:30
संचालिका महाडिक यांच्यावर नाव न घेता आरोप करताना डोंगळे म्हणाले..
कोल्हापूर : गोकुळला दूध घालणाऱ्या वाड्या, वस्त्यांमधील दूध संस्थांचे सभासदत्व कायम राहण्यासाठी वर्षातील २४० दिवस ५० लिटर दूध घालण्याची अट रद्द केली जाणार आहे. मल्टिस्टेटचा निर्णय घेणाऱ्यांनी आमच्यावर खासगीकरणाचा आरोप करणे हास्यास्पद असल्याचा पलटवार संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गुरुवारी येथे केला.
तीन संचालक विरोधात असूनही सातत्याने एकाच महिला संचालिका मंडळाच्या बैठकीत न बोलता बाहेर जाऊन गोकुळची बदनामी करतात. यावरून त्यांचा काहीतरी वेगळा हेतू असावा, दोन महिन्यांवर जे काही आले आहे. त्यासाठीही असावे, असा टोलाही नाव न घेता डोंगळे यांनी संचालिका शौमिका महाडिक यांना पत्रकार परिषदेत लगावला. त्यांनी महाडिक यांच्या सर्व आरोपांचे खंडन केले.
डोंगळे म्हणाले, ‘शासन जर ३० एकर जागा दिली तरच संघातर्फे पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय सुरू करणार आहे; अन्यथा आम्ही हा निर्णय घेणार नाही. यावर चर्चा झाली. त्या बैठकीस आता टीका करणारे आले असते, तर चांगली माहिती मिळाली असती; पण त्यांच्या सांगण्यावरून एक दिवस उशिरा बैठक घेऊनही त्या गैरहजर राहिल्या.’
दूध विक्री दरात घट होण्याला अनेक कारणे आहेत. बाजारात स्पर्धक दूध संघाचे दूध आले आहे. त्यामुळे विक्रीत घट झाली आहे. सन २०२२ पासून कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली असतानाही पशुखाद्याच्या दरात वाढ केलेली नाही. यामुळे पशुखाद्य उत्पादनातील नफ्यात घट दिसते. पात्र असलेलेच सभासद करून घेतले आहेत. नवीन संस्थांची नोंदणी शासनाच्या दुग्ध विभागातर्फे होते.
पत्रकार परिषदेस माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अजित नरके, किसन चौगुले, एस.आर. पाटील, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदींची उपस्थिती होती.
७० टक्के बैठकांना गैरहजर, नंतर येऊन सह्या करतात..
संचालिका महाडिक यांच्यावर नाव न घेता आरोप करताना डोंगळे म्हणाले, ‘आतापर्यंत झालेल्या ७० टक्के संचालक मंडळाच्या बैठकांना त्या गैरहजर राहिल्या आहेत. नंतर येऊन सह्या करतात. कदाचित संचालक मंडळाच्या बैठकांना त्यांना आवश्यक असणारा प्राॅम्टर घेऊन येण्यास परवानगी नसल्यामुळे त्या येत नसाव्यात.’