आरोग्यसेतू ॲपद्वारे असुरक्षित व्यक्तीस कोविड सेंटरमध्ये भरती करणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:24 AM2021-05-17T04:24:43+5:302021-05-17T04:24:43+5:30
कोल्हापूर : आरोग्य सेतू ॲपद्वारे एखादी व्यक्ती सुरक्षित नसल्यास अशा व्यक्तींना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये पुढील तपासणीकरिता पाठविणे बंधनकारक ...
कोल्हापूर : आरोग्य सेतू ॲपद्वारे एखादी व्यक्ती सुरक्षित नसल्यास अशा व्यक्तींना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये पुढील तपासणीकरिता पाठविणे बंधनकारक राहील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी काढला आहे.
कोविड प्रतिबंधासाठी १३ मे रोजी काढलेल्या आदेशात ही सुधारणा झाली असून ती १ जून सकाळी ७ पर्यंत लागू असणार आहे. याचा थेट परिणाम माल वाहतूक करणाऱ्या वाहकांवर होणार आहे.
माल वाहतूक करणाऱ्या वाहनामधून दोनपेक्षा जास्त नाही अशा व्यक्तींना (चालक क्लीनर / हेल्पर) प्रवास करण्यास परवानगी राहील. माल वाहतूक करणारी वाहने बाहेरच्या राज्यामधून येत असतील, तर अशा वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या वेळेच्या ४८ तास अगोदर देण्यात आलेला आरटीपीसीआर चाचणी असलेला अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात येत आहे. अहवाल हा सात दिवसापर्यंत वैध असेल. या ऐवजी माल वाहतूक करणाऱ्या वाहनामधून दोनपेक्षा जास्त नाही अशा व्यक्तींना (चालक क्लीनर / हेल्पर) किंवा लांब अंतराच्या आणि आपत्कालीन मालवाहतूक करणाऱ्या वाहनामधून तीनपेक्षा जास्त नाही अशा व्यक्तींना (दोन चालक क्लीनर | हेल्पर) प्रवास करण्यास परवानगी असेल. जर अशी मालवाहतूक करणारी वाहने बाहेरच्या राज्यामधून येत असतील तर अशा वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यावेळी त्याचे शरीराचे तापमान तपासणी आणि इतर लक्षणे तपासणे तसेच आरोग्य सेतू ॲपवरील स्थिती तपासणे. जर तपासणीमध्ये एखाद्या व्यक्तीला लक्षणे आढळल्यास अथवा आरोग्य सेतू ॲपद्वारे एखादी व्यक्ती सुरक्षित नसल्यास, अशा सर्व व्यक्तींना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये पुढील तपासणीकरिता पाठविणे बंधनकारक असेल, असे सुधारित आदेशात म्हटले आहे.