अपघाताची माहिती सुरक्षा विभागाला देणे बंधनकारक

By admin | Published: March 29, 2016 10:25 PM2016-03-29T22:25:31+5:302016-03-29T23:57:37+5:30

अभिजीत अवसरे : कंपनी-ठेकेदारांत कोणताही दुजाभाव नाही...

It is mandatory to give information to the Safety Department for the accident | अपघाताची माहिती सुरक्षा विभागाला देणे बंधनकारक

अपघाताची माहिती सुरक्षा विभागाला देणे बंधनकारक

Next

आवाशी : कोणत्याही कारखान्यात महिलांनी काम करणे, हा समान नागरी कायद्याचाच भाग असल्याने त्याचा महिलानाही अधिकार प्राप्त होतो. मात्र, कंपनी आवारात अपघात घडल्यास ती महिला कंपनीत काम करते की ठेकेदाराकडे यात दुजाभाव नसून, आवारात घडलेल्या कोणत्याही अपघाताची माहिती त्यांनी सुरक्षा विभागाला देणे हे बंधनकारक आहे, अशी माहिती सुरक्षा विभाग, कोल्हापूरचे निरीक्षक अभिजीत अवसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लोटे - परशुराम (ता. खेड) येथे शनिवारी नामांकित रासायनिक कारखान्यात एका महिलेला अपघात झाला. एक महिला एका रासायनिक कंपनीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पॉवर प्रोजेक्टमध्ये बांधकाम विभागात काम करत होती. सकाळच्या सत्रात कामावर असताना तिला कंपनीतच सर्पदंश झाला. तिथे काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तिला जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यावेळी ती बेशुध्द पडली होती. तिथे उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचार करून शुद्धीवर आणले व अधिक उपचारासाठी डेरवण येथे रुग्णवाहिकेतून पाठवले. यावेळी तिच्यासोबत तिच्या कामातील केवळ सहकारी होते. कंपनीचा वा ती ज्या ठेकेदाराकडे काम करते, तोही सोबत नव्हता. उपलब्ध माहितीनुसार अजूनही ती महिला तेथे उपचार घेत असल्याचे समजते.
या घटनेवर कंपनी प्रशासनाकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ‘लोकमत’ने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला असता कोल्हापूरचे सुरक्षा विभागाचे निरीक्षक अभिजित अवसरे यांनी सांगितले की, कंपनीत महिलांना काम करण्याचा अधिकार आहे. मात्र, आपल्याकडे अजून तरी रात्रपाळीत काम करण्यासाठी कोणताही अध्यादेश कार्यान्वित केलेला नाही. तरीदेखील ही महिला ठेकेदारी पद्धतीवर वा तत्सम कोणत्याही क्षेत्रात काम करत असेल आणि तिला अपघाताला सामोरे जाऊन वैद्यकीय उपचार घेण्याची वेळ येत असेल, तर तासाच्या कालावधीत ज्या कंपनीत अपघात घडला आहे, त्या कंपनीने सुरक्षा विभागाला माहिती देणे बंधनकारक आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दोन दिवसांपूवी घडलेली घटना कोणत्या कंपनीत घडली, याची माहिती घ्या आणि आम्हाला कळवा, आम्ही त्वरित कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले. मात्र, या वसाहतीत दररोज किरकोळ वा गंभीर स्वरूपाचे अपघात होत असतात. अशावेळी इथल्या राजकीय वा स्थानिक ठेकेदाराला हाताशी धरून पोलिसांकरवी ही प्रकरणे दडपण्यात येतात. हाही अपघात तसाच दडपला गेल्याची दाट शक्यता आहे, असे म्हटले जात आहे.
स्थानिक पोलिसांना माहिती देऊनही मंगळवारी त्यांना विचारणा केली असता त्यांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. याबाबत अवसरे म्हणाले की, कंपनी आवारात घडलेला अपघात छोटा असो वा मोठा, त्याची माहिती सुरक्षा विभागाला देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, इथे तसे होताना दिसत नाही. परवाच्या अपघाताबाबत यामध्ये कमालीची दिरंगाई दिसून आली असून, असे प्रकार या वसाहतीत सातत्याने दिसून येतात.
ती महिला कंपनीची कायमस्वरूपी कामगार असती तर तिची तरी नोंद घेतली असती का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या आणि एकूणच कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (वार्ताहर)


लोटे परशुराम येथील रासायनिक कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पात काम करत असताना महिलेला झाला सर्पदंश.
कंपनी प्रशासनाकडून घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न.
कंपनीत अपघात झाल्यानंतर तासाभरात सुरक्षा विभागाला माहिती देणे कंपनीला बंधनकारक : अवसरे यांची माहिती.

Web Title: It is mandatory to give information to the Safety Department for the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.