..'तरी आरटीपीसीआर सक्ती करुन नागरिकांना परत पाठवणे योग्य नाही, कर्नाटकची भूमिका आडमुठेपणाची'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 02:55 PM2022-01-03T14:55:06+5:302022-01-03T15:01:49+5:30
नॅशनल हायवे बंद करणे चुकीचे आहे. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारशी पत्र व्यवहार करून विनंती करेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर : नागरिकांना राज्यात प्रवेश देण्याबाबत कर्नाटक सरकारची भूमिका नेहमीच आडमुठेपणाची राहिली आहे. देश-परदेशांमध्ये दोन डोस असेल तर प्रवेश दिला जात असताना आरटीपीसीआरची पण सक्ती करुन नागरिकांना परत पाठवणे योग्य नाही मी स्वत: याबाबत कर्नाटक सरकारला पत्र पाठवून विनंती करेन अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली.
कर्नाटक सरकारकडून कोगनोळी टोल नाक्यावर नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असले तरी आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करून नागरिकांना परत पाठवले जाते याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
ते म्हणाले, केंद्र शासनाने राज्यांमधील प्रवेशाबाबत काही निकष घालून दिलेले आहेत. दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी अहवाल असा निकष आहे. दोन डोस झाले असतील देशात परदेशात कुठेही फिरता येते मग कर्नाटकात प्रवेश का दिला जात नाही.
कर्नाटकमध्ये नागरिकांना रोज ये-जा करावे लागते, दैनंदिन व्यवहार करायचे असतात, गडहिंग्लज, चंदगडला जायचे असले तरी कोगनोळीवरून जावे लागते. असे असताना नॅशनल हायवे बंद करणे चुकीचे आहे. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारशी पत्र व्यवहार करून विनंती करेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.