आता १८ वर्षांपर्यंतच्या मुलांवर उपचार करणे सुसह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2015 12:25 AM2015-04-29T00:25:14+5:302015-04-29T00:25:39+5:30
जिल्हा रुग्णालयांमधून मोफत उपचार : ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रम जुलैपासून
गणेश शिंदे - कोल्हापूर --विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, या उद्देशाने केंद्र शासन १८ वर्षांपर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रम जुलै २०१५ पासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करणार आहे. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आणि आता सत्ताधारी भाजप सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तत्कालीन केंद्र सरकारमधील काँग्रेस आघाडीने २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राज्यात सर्वत्र ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्यात ३० रुग्णालयांत ही योजना सुरू आहे. यामध्ये १०५ आजार आहेत. या नोंदणीकृत रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांना उपचार घेता येणार आहे. मात्र, तो शाळेचा विद्यार्थी पाहिजे, अशी अट आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये या वयोगटातील मुले ही जन्मजात आजारी असली पाहिजेत. (उदा. जन्मजात मोतीबिंदू, बहिरेपणा, व्यंग, आदी). त्याचबरोबर ४९ आजार हे दंतांशी संबंधित आहे. सध्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी गगनबावडा, राधानगरी येथे शिबिरे सुरू आहेत.
आतापर्यंत चार रुग्णालयांचा सामंजस्य करार
कोल्हापूर जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेमधून ३० रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी आतापर्यंत कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील (कदमवाडी), मसाई रुग्णालय (लुगडी ओळ, माळकर तिकटी), जयसिंगपूर येथील पायस रुग्णालय, महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुग्णालय यांनी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. कोल्हापुरातील २४, तर गडहिंंग्लजमधील ३ तसेच इचलकरंजी, वडगाव, जयसिंगपूर या ठिकाणी प्रत्येकी एक अशा ३० रुग्णालयांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू आहे.
यांचे राहणार नियंत्रण
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमावर (आरबीएसके) जिल्हा शल्यचिकित्सक व समन्यवयक यांचे नियंत्रण असणार आहे. १०५ पैकी ६८ आजारांवरील पैसे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) मधून संबंधित रुग्णालयांना देण्यात येणार आहेत. याला जिल्हा शल्यचिकित्सक मंजुरी देणार आहेत. मात्र, एखाद्या विद्यार्थ्याने ‘राजीव गांधी जीवनदायी’मधील ३७ आजारांवर उपचार घेतले, तर त्याचे पैसे हे नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एनआयसी)मधून या रुग्णालयांना मिळणार आहेत.
दोन्ही योजनांमधील हा आहे फरक...
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये एका कुटुंबाला दीड लाख रुपये खर्च शासन देते, तर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये खर्चाची कोणतीही मर्यादा नाही. तसेच ‘राजीव गांधी जीवनदायी’मध्ये उत्पन्नाची अट ही एक लाखापर्यंत आहे, पण राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये उत्पन्नाची कोणतीही अट नाही.
पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आजार कमी होऊन शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक,
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर.