जिल्ह्यात दिवसभर उघडीप़ तर काही ठिकाणी नुसतीच भुरभुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:28 PM2020-06-08T18:28:04+5:302020-06-08T18:33:21+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. मात्र, काही ठिकाणी अधूनमधून पावसाची नुसतीच भुरभुर होती. मान्सून गतीने महाराष्ट्राकडे आगेकूच करू लागल्याने वातावरणात काहीसा बदल जाणवत आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. मात्र, काही ठिकाणी अधूनमधून पावसाची नुसतीच भुरभुर होती. मान्सून गतीने महाराष्ट्राकडे आगेकूच करू लागल्याने वातावरणात काहीसा बदल जाणवत आहे.
जूनचा पहिला आठवडा संपल्याने आता सगळ्यांनाच मान्सूनचे वेध लागले आहेत. गेल्या दोन वर्षातील अनुभव पाहता मान्सूनने वेळेवर हजेरी लावली होती. जूनच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात तो काहीसा गायब होतो. मात्र, सुरुवात दमदार करतो.
यामुळे खरिपाची उगवण होऊन पिकांच्या आंतरमशागतीला शेतकऱ्यांना वेळ मिळतो. यंदा निसर्ग चक्रीवादळाने जूनचा पहिला आठवडा गेला. दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मान्सून कर्नाटकात आला असून त्याचा वेग चांगला असल्याने तो बुधवारपर्यंत महाराष्ट्रात धडक मारेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.
चंदगडमध्ये काल 2.83 मिमी पाऊस
जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 2.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात शाहुवाडी तालुक्यात 2.50 मिमी पावसाची नोंद झाली असून इतर सर्व ठिकाणी पाऊस निरंक आहे.
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा
तुळशी 45.44 दलघमी, वारणा 330.93 दलघमी, दूधगंगा 208.78 दलघमी, कासारी 24.70 दलघमी, कडवी 30.35 दलघमी, कुंभी 27.30 दलघमी, पाटगाव 24.27 दलघमी, चिकोत्रा 13.93 दलघमी, चित्री 13.05 दलघमी, जंगमहट्टी 7.43 दलघमी, घटप्रभा 12.70 दलघमी, जांबरे 5.79 दलघमी, कोदे (ल पा) 0.99 दलघमी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
राजाराम 11.2 फूट, सुर्वे 11.6 फूट, रुई 39 फूट, तेरवाड 34 फूट, शिरोळ 27.6 फूट, नृसिंहवाडी 23 फूट, राजापूर 12 फूट तर नजीकच्या सांगली 5.6 फूट व अंकली 8.6 फूट अशी आहे.